पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१४८
 

त्यांना आत्मभाव नव्हता. सार्वराष्ट्रिक विरोधाची सिद्धता भारतात प्रथम शिवाजीने केली. त्याच्या आधी राष्ट्रभावनेचा येथे अभाव होता. अशा रीतीने धर्मभावनेचे शैथिल्य व राजकीय उदासीनता हीच भारताच्या नाशाची कारणे होत. हे शैथिल्य व ही उदासीनता येथे निर्माण झाली ती प्रातिनिधिक संस्थांच्या अभावामुळे प्रातिनिधिक तत्त्वावर उभारलेल्या राजकीय संस्था येथे असत्या तर राष्ट्राच्या सुखदुःखात आपले सुखदुःख आहे ही कल्पना दृढमूल होऊन भारताचा विनाश टळला असता. ( मध्ययुगीन भारत, भाग १ ला व २ रा यांतून निरनिराळ्या ठिकाणचे विचार येथे संकलित करून दिले आहेत. पाहा - भाग १ ला पृ. १७४ - १८८; भाग २ रा प्रकरण १६, १७.)

जुनी चऱ्हाटे
 या बाबतीत म. म. काणे यांनी मोठे उद्बोधक विवेचन केले आहे. ते म्हणतात, 'एकदा आरंभीच्या शास्त्रज्ञांनी राजनीतीची रूपरेखा काढून दिल्यानंतर पुढील दोन हजार वर्षे लोक त्या चाकोरीतून फिरत राहिले. राजशासनाचा स्वतंत्र अभ्यास कोणी केला नाही. आणि नवे सिद्धांत, नव्या उपपत्ती कोणी मांडल्या नाहीत. प्राचीन ग्रंथकारांची, समाज कायमचा स्थितिशील करून टाकण्याची प्रवृत्ती होती. गतिमान, विकसनशील विचार किंवा उद्योग याला त्यांनी उत्तेजन दिले नाही. प्रथम शक, हूण आणि नंतर मुस्लिम यांची या हजार दीडहजार वर्षांच्या काळात भयंकर आक्रमणे होत होती. नित्य जाळपोळ, अत्याचार चालू होते. धर्मच्छळ चालू होता. तरी तेथल्या विचारवंतांनी, योद्ध्यांनी, मुत्सद्द्यांनी आपल्या मर्यादित क्षितिजापलीकडे दृष्टी फेकली नाही; आणि अखिल भारतभर विखुरलेली लहान लहान राज्ये संघटित करून त्यांचे एक बलशाली राष्ट्र तयार केले नाही. एक समान ध्येय व समान तत्त्व प्रतिपादून पुढे काही प्रमाणात विजयनगर व महाराष्ट्र यांनी जशी आक्रमकांच्या प्रतिकारार्थी संघटित आघाडी उभारली तशी त्यांना उभारता आली असती; पण तसे त्यांनी केले नाही. उलट जुन्या सिद्धान्ताचे दोर घेऊन त्यांचीच ते चऱ्हाटे वळीत बसले. त्यांनी नवे तत्त्वज्ञान निर्मिले नाही किंवा गेली दोनतीन शतके पाश्चात्यांनी ज्याप्रमाणे देशभक्तीच्या भावनेची जोपासना केली तशी अखिल भरतभूमीविषयीची भावना दृढमूल करून भारत दृढपणे संघटित केला नाही.' (हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र, खंड ३ रा, प्रकरण १० वे. ) अन्यत्र याच विषयाचा विचार करताना त्यांनी म्हटले आहे की 'अकराव्या शतकानंतर आपल्या अधःपाताच्या कारणांची चिकित्सा करणारा एकही पंडित येथे होऊ नये हे दुर्दैव होय. गझनीच्या महंमदापुढे आपण का पराभूत झालो याची मीमांसा कोणी केली नाही. त्या वेळी विद्यावंत लोक व्रत, दान, श्राद्ध, काव्यशास्त्र, वेदान्त या विषयांत बौद्धिक कसरती करण्यात मग्न होते. त्यांनी परकीय आक्रमणाच्या प्रतिकाराचा विचारही केला नाही. ' ( खंड ५ वा, पृ. १६२३ )