पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४३
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

दोन ठिकाणी मांडला आहे. लोकसंघटनेच्या दृष्टीने त्याची आता चिकित्सा करू. विचार, उच्चार व आचार यांचे स्वातंत्र्य भोगणारी, त्यामुळे व्यक्तिमत्त्व कणखर होऊन अन्यायाचा, विषमतेचा प्रतिकार करण्यास सदा सज्ज असलेली, आपल्या मानवत्वाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी वाटेल ते मोल देण्यास ज्यांची सिद्धता आहे अशी माणसे, अशा व्यक्ती हा लोकशाहीचा, स्वायत्त संस्थांचा पाया आहे, मूलाधार आहे. अशी माणसे संघटित होऊन जो समाज बनतो त्या समाजाला, व तो जेथे वसलेला असतो त्या भूप्रदेशाला स्वतंत्र अस्मिता प्राप्त होते. आणि अशा समाजात व अशा भूमीतच लोकायत्त संस्थांचा विकास होतो, पण सातवाहन कालापासून महाराष्ट्राचा इतिहास पाहता, मागे वर्णिलेल्या ग्रामसभेसारख्या स्वायत्त संस्था येथे असूनही तशा कणखर व्यक्ती व तसा मुक्त व स्वतंत्र समाज येते केव्हाच निर्माण झाला नाही, असे दिसते. प्रारंभापासून येथे महाराष्ट्री ही लोकभाषा झाल्यामुळे महाराष्ट्र समाजाला पृथगात्मता प्राप्त झाली; पुढे पुढे आपली मरहट्ट, भूमी, आपली देसभासा हिचा अभिमानही लोकांत प्रादुर्भूत झाला आणि आम्ही मरहट्टजन श्रेष्ठ आहो, पराक्रमी आहो हा अहंकारही त्यांच्या ठायी जाणवू लागला हे खरे. पण अशा या लोकांनी हे आम्ही मराठे आणि ही आमची भूमी अशा भावनेने राजकीय दृष्टीने आपली संघटना कधीच केली नाही. आणि तसे संघटित बलही ते निर्मू शकले नाहीत. पहिल्यापासून अखेरपर्यंत महाराष्ट्रभूमीत राजकीय संघटना झाली ती राजसत्तेमुळेच झाली. सत्तेची स्थापना, तिचे दृढीकरण, तिचा विस्तार आणि परकीय आक्रमणापासून स्वराज्याचे संरक्षण या सर्व जबाबदाऱ्या राजाच्या होत्या. या स्वायत्त संस्थांचा त्यात कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रात व अन्यत्रही मोठमोठी साम्राज्ये झाली, राजांनी, सेनापतींनी, सामंतांनी व लोकांनी पराक्रमही केले, पण तरीही एवढ्या दीर्घकालात येथे समाजसंघटनांचे कोणतेही तत्त्व निर्माण झाले नाही. तत्कालीन लोकायत्त संस्था होत्या त्यापेक्षा राजकीय दृष्टीने जास्त प्रबुद्ध असत्या, राज्य आपले आहे, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे, आपणच त्याच्या भवितव्याचे शिल्पकार आहो अशी जाणीव त्यांच्या ठायी असती तर या देशात एक प्रबल संघटनतत्त्व निश्चित निर्माण झाले असते व मग हा समाज संघटित झाला असता. पण चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, न्यायालयीन विषमता, आनुवंशावरील अंधश्रद्धा, वेदप्रामाण्य, रूढींचे दास्य या शृंखलांनी बद्ध असलेल्या समाजात कोणतेही संघटनतत्त्व निर्माण होणे व दृढमूल होणे कालत्रयी शक्य नव्हते. या शृंखला तोडण्याचे सामर्थ्य बुद्धिप्रामाण्यवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, राजकीय, सामाजिक दृष्टीने प्रबुद्ध अशा व्यक्तींनाच असते. अशा व्यक्ती त्या लोकायत्तसंस्था निर्माण करू शकत नव्हत्या.

आपपर भाव
 कोणत्याही लोकांची, समाजाची संघटना व्हावयाची तर त्यांच्या ठायी निश्चित