पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१४४
 

असे आपपर भाव दृढपणे असावे लागतात. हे आम्ही व ते परके, आमचे शत्रू अशी जाणीव लोकांच्या मनात सदैव जागरूक असावी लागते. आपपर यातील आप या शब्दाचा विचार केला तर आपण सर्व हिंदू एकरूप आहो असे म्हणण्याजोगे या समाजाजवळ काहीही नव्हते व नाही. किंबहुना तसे नसलेच पाहिजे असे हिंदुधर्म- शास्त्र आहे. ( ' महारष्ट्रातील समाजरचना' या प्रकरणात याचा तपशिलवार विचार येईल. ) त्यामुळे हिंदुसमाजाला संघटनतत्त्व असे नाहीच. त्यामुळे परकी आक्रमणाला हा समाज सतत बळी पडत आला आहे. अगदी प्रारंभीच्या काळी आम्ही आर्य व इतर अनार्य, हे आमचे शत्रू असा आपपर भाव येथे निश्रित होता. त्या वेळी आप या शब्दाला अर्थ होता. या आर्यात समता नांदत होती. बेटीबंदी, रोटीबंदी, स्पर्शबंदी या शृंखला तेव्हा नव्हत्या. समाज बव्हंशी एकरूप होता. म्हणूनच याच्या ठायी राष्ट्र या तत्त्वाचा उदय होत होता, झाला होता. हे आम्ही आर्य व आर्यावर्त ही आमची भूमी असा स्वत्वनिश्चय या समाजात तेव्हा होता. ('हिंदुसमाज संघटना आणि विघटना' या माझ्या ग्रंथाच्या पहिल्या चार प्रकरणांत या विषयाचे विवेचन विस्ताराने केले आहे. ते जिज्ञासूंनी पाहावे. ) कारण 'लोक' या शब्दाला तेव्हा फार अर्थ होता. शुद्रांनी जन्मभर दास्यच केले पाहिजे, अंत्यजांचा शब्दही ब्राह्मणांनी कानावर येऊ देता कामा नये, असले मानवत्वाच्या प्रतिष्ठेला घातक, मानवाला गुराढोरां- सारखे वागविणारे मूढ धर्मशास्त्र तेव्हा नव्हते. त्या शास्त्राचा जेव्हा अवतार झाला तेव्हा लोक, व्यक्ती, तिची प्रतिष्ठा या कल्पना नष्ट झाल्या आणि या समाजाची एकरूपता भंगून त्याला संघटनतत्त्व असे राहिलेच नाही. पुढच्या काळात निगमसभा, ग्रामसभा, श्रेणी, संघ, पूरा या स्वायत्त संस्था टिकून राहिल्या होत्या हे खरे. आणि त्यामुळे काही प्रमाणात या समाजात कर्तृत्वाची जोपासना होत राहिली हेही खरे. पण त्यांचा विकास होऊन सर्व समाज स्वायत्त व्हावा, विशाल प्रजासत्ताके त्यातून निर्माण व्हावी असे सत्त्व त्यांच्या ठायी राहिले नाही. वेदकाळापासून, निदान इ. पू. एक हजार या काळापासून भारतात अनेक गणराज्ये निर्माण झाली होती. ती इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत कोठे कोठे टिकूनही राहिली होती. शिकंदराच्या स्वारीच्या वेळी कठ, सौभूती, मालव, क्षुद्रक अशा गणराज्यांनी पराक्रमही मोठा केला. पण ही गणराज्ये अगदी लहान व मर्यादित स्वरूपाची होती. मोठ्या प्रचंड आक्रमणास तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते. मगध, मौर्य, सातवाहन या साम्राज्यांसारखे विशालरूप त्यांना आले असते तर तोही पराक्रम त्यांनी केला असता. पण एवढ्या दीर्घ कालात त्यांचा असा विकास तर झाला नाहीच, उलट तीच हळूहळू निर्माल्यवत होऊन शेवटी नाहीशी झाली. जे गणराज्यांचे झाले तेच येथल्या राष्ट्रांचे झाले. आरंभी ही निष्ठाही येथे जोपासली जात होती. पण तिचा विकास होऊन अखिल भारताचे एक राष्ट्र येथे कधीही निर्माण झाले नाही. त्या मागल्या काळात एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशाविषयी दळणवळणांच्या साधनाच्या अभावी अशी निष्ठा