पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१४२
 

प्रभावी होऊ शकल्या नाहीत आणि उत्तर काळात जातिबंधने कडक होऊ लागली तेव्हा त्यांच्या सामर्थ्याला आहोटी लागली. त्यातच निवृत्तिवाद, इहविमुखता यांची भर पडून समाज परमार्थप्रवण होऊन राजकारणाविषयी उदासीन होऊ लागला आणि मग या स्वायत्त संस्था अगदी क्षीण होऊन मुसलमानी आक्रमणाचा प्रतिकार करण्याचे कसलेही सामर्थ्य या भूमीत राहिले नाही.

शब्दांची विटंबना
 अशा स्थितीत इ. स. १००० । १२०० नंतरच्या काळात, मुस्लिम व इंग्रज यांच्या सत्ताकाळातही या स्वायत्त संस्थांनी हिंदू संस्कृतीचे रक्षण केले व तिची मूलतत्त्वे अबाधित राखली, असे राधाकुमुद मुकर्जींसारखे पंडित म्हणू लागले तर हिंदु- संस्कृती, स्वायत्तसंस्था, संरक्षण या सर्वच शब्दांची ती विटंबना आहे असेच मानाचे लागेल. आक्रमक मुस्लिम सेना लाखांनी हिंदूंच्या कत्तली करीत, त्यांच्या स्त्रिया पळवीत, त्यांची देवळे फोडीत आणि लाखलाख लोकांचे सक्तीने धर्मांतर करीत. याचा कसलाही प्रतिकार राष्ट्र, विषय, भुक्ती आणि ग्राम या विभागांतील स्थानिक स्वराज्यांना करता आला नाही. तरी त्यांनी हिंदुसंस्कृतीचे, हिंदूंच्या स्वातंत्र्याचे धर्माचे रक्षण केले, असे मुकर्जींनी म्हणावे आणि त्या ग्रामसभा म्हणजे आमची प्राजके होती असे महात्माजी, जयप्रकाशजी यांनी म्हणावे, ही खरोखर अजब गोष्ट आहे. यातील तर्कसंगती जाणणे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. मुस्लिम अमलात या ग्रामसभांनी देशाचे, धर्माचे, संस्कृतीचे रक्षण तर नाहीच केले, तर उलट त्याच स्वतः नाहीशा झाल्या असे इतिहास सांगतो. यदुनाथ सरकार म्हणतात, 'मुस्लिम अमलात ग्रमीण भागात सर्वत्र दहशतीचे, निराशेचे वातावरण असे. लोकांच्या नित्य कत्तली होत त्यामुळे समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. पश्चिम हिंदुस्थानातून ग्राममहत्तरांच्या सभा नाहीशाच झाल्या आणि पाटील हा कुलमुखत्यार झाला. गुजराथेमध्ये मुस्लिम राजवटीत ग्रामसंस्था शून्य झाल्या आणि ब्रिटिश राज्याने त्यांचा प्राणघातच केला. ' यदुनाथ सरकार यांचे हे मत उद्धृत करून डॉ. आळतेकरांनी आपलेही तेच मत असल्याचे नमूद केले आहे. पश्चिम भारतात मुस्लिम राजवटीत ग्रामसंस्थांचा विकास सर्वतोपरी खुंटला आणि त्यांच्या कार्यशक्ती अगदी क्षीण होऊन गेल्या, असे ते म्हणतात. ( हिस्टरी ऑफ व्हिलेज कम्यूनिटीज इन वेस्टर्न इंडिया, पृ. २९-३१ )

मूलाधार - व्यक्तित्व
 निगमसभा, विषयसभा आणि विशेषतः ग्रामसभा यांसारख्या लोकायत्त संस्था तीनचार हजार वर्षे या देशात असूनही त्यांच्यातून मगध, मौर्य, सातवाहन, गुप्त या साम्राज्यांसारखी विशाल व पराक्रमी प्रजासत्ताके निर्माण झाली नाहीत हा विचार वर