पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

नीतिशास्त्रावर येथे इतके ग्रंथ झाले, पण त्यांत व्यक्तीच्या हक्काबद्दल अवाक्षरही नाही. व्यक्ती हा समाजाचा घटक होय हे खरे. पण तो एक जिवंत व स्वयंपूर्ण घटक आहे, व्यक्ती हे अंतिम मूल्य आहे, हा विचार हिंदुशास्त्रकारांच्या स्वप्नातही कधी आला नाही. शास्त्र सांगताना समाजरक्षण हे एकच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी व्यक्तीवर अनंत कर्तव्यबंधने लादली. पण व्यक्तीच्या विवेकदेवतेचे महत्त्व त्यांनी कधी सांगितले नाही. व्यक्तीला व्यक्ती म्हणून काही हक्क असल्यावाचून तिला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, ही जाणीव त्यांनी ठेविली नाही. डॉ. वेणीप्रसाद म्हणतात, समाजाचे महत्त्व वर्णिता वर्णिता शास्त्रकारांनी व्यक्तिमूल्ये जवळ जवळ नष्ट करून टाकली. त्यांच्या शास्त्राने माणसांच्या व्यक्तित्वावरच घाव घातला. त्यामुळे व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारल्या सारखेच झाले (थिअरी ऑफ गव्हर्मेंट, पृ. ७ ) भारताच्या प्राचीन इतिहासात व्यक्तीने तिला अन्याय्य वाटणाऱ्या समाजबंधनाविरुद्ध समाजाशी झगडा केल्याचे एकही उदाहरण नाही. प्राचीन काळी ग्रीसमध्ये सॉक्रेटिसाने आणि गेल्या तीनचारशे वर्षात युरोपमध्ये जॉन हस, ब्रूनो, लूथर, रूसो, व्हॉल्टेअर अशा थोर पुरुषांनी आपल्या विवेकाच्या आदेशावरून समाजसंस्था, धर्मसंस्था यांशी सतत संग्राम चालू ठेवला आणि त्यात पुष्कळ वेळा मृत्यूही पत्करला; म्हणूनच युरोपला वैभव प्राप्त झाले. भारतात विवेकवळाने विश्वाविरुद्ध संग्राम करणारी एकही व्यक्ती कधी निर्माण झाली नाही.

ग्रामदाने
 भारतामध्ये प्राचीन काळी ब्राह्मणांना त्यांच्या धर्मकर्मासाठी, विद्यादानाचे कार्य चालविण्यासाठी आणि सरदार सामंतांना लढाईत पराक्रम केल्याबद्दल गावेच्या गावे दान देण्याची पद्धत होती. अशी हजारो ग्रामदानपत्रे कोरीव लेखांच्या रूपात आज उपलब्ध झाली आहेत. आज भारताचा इतिहास जो थोडाबहुत प्रकाशात आला आहे तो या दानपत्रांवरूनच आला आहे. या दानपत्रांत त्या त्या गावातील गावकऱ्यांना राजाने असे आदेश दिलेले आढळतात की 'आजपर्यंत तुम्ही आमच्या आज्ञा पाळीत आला तशा यापुढे अमक्याच्या ( हे दान घेणाऱ्याच्या ) आज्ञा पाळीत चला.' यावरून हे स्पष्ट होते की ग्रामसभांना करवसुली, न्यायदान, संरक्षण हे जरी अधिकार असले तरी गाव कोणाच्या मालकीचे असावे, हे ठरविण्याचा कसलाही हक्क त्यांना नव्हता. सर्व राज्याची सत्ता कोणाकडे असावी, राजाचा वारस कोण असावा, हे ठरविण्याचा ज्याप्रमाणे त्यांना कसलाही हक्क नव्हता, चालुक्यांना पदभ्रष्ट करून तेथे राष्ट्रकूट आले तर त्यांच्यापुढे जशी त्या सभा निमूटपणे मान वाकवीत. त्याचप्रमाणे राजाने गावची मालकी एकाकडून काढून दुसऱ्याकडे दिली तर त्या नव्या धन्यापुढे पहिल्याप्रमाणेच ग्राममहत्तर किंवा ग्राममहाजन मान वाकवीत. त्यांना वाकवावी लागे. अशा स्थितीत लोकायत्त शासनाच्या विकासाला अवश्य ते कणखर व्यक्तिमत्त्व व्यक्तीच्या ठायी कसे जोपासले जावे ? ते न जोपासले गेल्यामुळे या स्वायत्त संस्था