पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१३८
 

करीत असत. या टीकेची प्रतिक्रियाही त्याच वेळी होऊन पंडितांनी भारताच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करून येथल्या ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचे आदर्श होते, असे मत मांडले. स्वातंत्र्याच्या चळवळीत 'खेड्याकडे चला' ही घोषणा झाली, त्या वेळी महात्माजीप्रभृती नेत्यांनी त्या मताचा हिरीरीने पुरस्कार केला, हे वर सांगितलेच आहे. याच सुमारास १९१८ साली डॉ. राधाकुमुद मुकर्जी यांचा 'लोकल सेल्फ गव्हर्मेन्ट इन एन्शंट इंडिया' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात 'भारताचे स्वातंत्र्य, त्याचे व्यक्तित्व व त्याची एकात्मता, एकंदर भारतीय संस्कृतीचे वैशिष्य टिकून राहिले ते या लोकायत्त संस्थांमुळेच होय,' असे मत त्यांनी मांडले. सर जॉर्ज बरवुड व सर चार्लस मेटकाफ या इंग्रज पंडितांनीही या प्राचीन संस्थांचा गेल्या शतकात गौरव केला होता. भारतातील या संस्था म्हणजे नोहाची आर्क - नाव होती, अनेक प्रलय येथे झाले, उत्पात झाले, पण या ग्रामसभा टिकून राहिल्या आणि त्यांनीच हिंदू संस्कृतीचे प्राणतत्त्व टिकवून धरले, अशा तऱ्हेची मते त्यांनी मांडली होती. ती उद्धृत करून डॉ. मुकर्जींनी मोगलकाळात व ब्रिटिशांच्या अमलातही हिंदू संस्कृती पूर्णपणे अबाधित राहिली होती आणि त्याचे श्रेय या स्वायत्त संस्थांनाच आहे असे मत आपल्या ग्रंथात मांडले. हे सर्व ध्यानी घेऊन व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्य इ. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या निकषांवर त्या प्राचीन लोकायत्त संस्थांचे परीक्षण आता करावयाचे आहे.
 हे परीक्षण करू लागताच आपल्या एक गोष्ट ध्यानात येते की आज इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्विट्झरलंड, स्वीडन, हॉलंड या देशांत ज्या प्रकारची लोकशाही आहे किंवा ग्रीसमध्ये अथेन्सच्या वैभवाच्या काळी आणि रोममध्ये प्रारंभीच्या काळी ज्या स्वरूपात लोकशाही होती तशी भारतात कधीही अस्तित्वात नव्हती. प्राचीन भारतात दोन तीन हजार वर्षे ठिकठिकाणी गणराज्ये होती. आणि ग्रामसभा तर सर्वत्रच होत्या. आणि त्या काळच्या अतुल वैभवाचे श्रेय बरेचसे त्यांना आहे, हे खरे. पण इतका दीर्घकाळ या संस्था येथे असताना येथे विशाल प्रजासत्ताक राज्ये निर्माण झाली नाहीत आणि राष्ट्रभावनाही अवश्य त्या प्रमाणात जोपासली गेली नाही हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आणि या स्वायत्त संस्थांचे श्रेय त्यांना दिल्यानंतर अंतर्मुख होऊन आपण त्याच्या परीक्षणास सिद्ध झाले पाहिजे.

चातुर्वर्ण्य- विषमता
 भारतातील प्राचीन लोकसत्तांचा विचार करताना आपण ही गोष्ट सतत लक्षात ठेविली पाहिजे की प्राचीन धर्मशास्त्रज्ञांनी येथली शासनसंस्था चातुर्वर्ण्याच्या चौकटीत जी एकदा बसवून टाकली ती त्या चौकटीतून कधीच मुक्त झाली नाही. आणि चातुर्वर्ण्य म्हणजे विषमता हे सत्य दृष्टिआड करून चालणार नाही. सर्व धर्मशास्त्रज्ञांनी एकमुखाने चातुर्वर्ण्याचे संरक्षण हे राजाचे परमश्रेष्ठ कर्तव्य म्हणून सांगितले