पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३७
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

कालखंडातील वैभवाला या स्वायत्त संस्था बऱ्याच अंशी कारणीभूत झाल्या असल्या पाहिजेत हे मानणे हे ओघानेच येते. ही कार्यकारणमीमांसा बहुमान्य होईल असे वाटते. व्यक्तिस्वातंत्र्य ही सर्व मानवी कर्तृवाची जननी आहे. सर्व मानवी पुरुषार्थाची ती मूलप्रेरणा आहे. विचार, उच्चार आणि आचार यांचे स्वातंत्र्य ज्या प्रमाणात समाजाला मिळते त्या प्रमाणात त्याचे कर्तृत्व फुलते हे जगाच्या इतिहासात पदोपदी दिसून येते. प्राचीन भारतात हे स्वातंत्र्य बऱ्याच प्रमाणात व्यक्तींना मिळत असल्यामुळेच सर्व क्षेत्रात या भूमीचे वैभव समृद्ध झाले यात शंका नाही. हे स्वातंत्र्य व्यक्तींना प्राप्त करून देण्याचे बरेचसे श्रेय येथील स्वायत्त संस्थांना आहे, असे आज इतिहासवेत्ते सांगत आहेत. वेदकाळापासून या देशात सभा, समिती, श्रेणी, पूरा या संस्था अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्यांचे नेमके स्वरूप काय होते, त्यांना अधिकार कितपत होते, आज जी लोकशाहीची रूढ तत्त्वे आहेत त्यांअन्वये त्या पूर्ण लोकायत्त होत्या काय याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या भूमीत वेदकाळापासून लोकायत्त संस्था होत्या व सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वाचे स्थान होते ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. डॉ. जयस्वालांच्या मते इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत भारतात बऱ्याच प्रदेशांत गणराज्ये चालू होती. गुप्तांच्या साम्राज्याच्या अखेरीस त्यांचा अस्त झाला व नंतर, त्यांच्या मते, येथे मध्यम वर्ग नष्ट होऊन विद्या व शास्त्रे हळूहळू ऱ्हास पावू लागली. सर्वच पंडितांना हे मत मान्य नाही. पाचच्या शतकात गणराज्ये नष्ट झाली हे खरे. पण वर सांगितलेल्या लोकायत्त संस्था अजून कायम होत्या. अणि डॉ. आळतेकर यांच्या मते पाचव्या सहाव्या शतकापासून दक्षिणेत त्यांचा जोर वाढतच गेला. डॉ. रमेशचंद्र मुजुमदार यांनी हेच मत मांडले आहे पण नवव्या दहाव्या शतकापासून मात्र जातिभेद, संन्यासवृत्ती, इहविमुखता यांमुळे या संस्था क्षीणबल झाल्या आणि मग या देशाचे नष्टचर्य ओढवले असे ते म्हणतात ( एन्शंट इंडिया, प्रकरण २१ वे ).
 भारतातील लोकायत्त संस्थांचे स्वरूप, त्यांचे कार्य व त्यांचा कारभार यांचा येथवर विचार केला. प्राचीन भारताच्या वैभवामागे ती एक महत्त्वाची शक्ती होती हा पंडितांचा विचारही आपण पाहिला. आता या संस्थांच्या लोकायत्ततेची जरा जास्त चिकित्सा करून मग त्या संस्था या भूमीत लोकसंघटनेस कितपत उपकारक झाल्या याचा विचार करावयाचा आहे.

लोकशाहीचे आदर्श ?
 अर्वाचीन काळात भारतात लोकशाहीचे वारे वाहू लागले. त्या वेळी प्राचीन इतिहासाची चिकित्साही सुरू झाली. भारतीय नेत्यांना स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकाची स्वप्नेही पडू लागली. त्या वेळी, भारतात पूर्वी कधीही लोकशाही नव्हती व येथल्या लोकांचा पिंडच लोकशाहीला अनुकूल नाही, अशी अनेक इंग्रज इतिहासकार टीका