पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३९
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

आहे. त्या काळातील अनेक राजांनी आपण चातुर्वर्ण्याचे संरक्षक आहो असे अभिमानाने आपल्या दानपत्रात सांगितलेले आहे. प्रारंभीच्या काळी चातुर्वर्ण्य जन्मनिष्ठ नव्हते. त्या काळी वर्ण नसून वर्ग होते असे पंडित सांगतात. पण पुढे पुढे वर्ण जन्मनिष्ट झाले आणि वर्णसंकर हे भयंकर पाप मानले जाऊ लागले. तरी याही काळात वर्णाची बंधने कडक नव्हती. पुढे ती कडक झाल्यावर विषमता वाढीस लागली आणि वर्णसंकरातून अनेक जाती उद्भवल्या. या वर्णात व जातीत पुढे अस्पृश्य या पंचम वर्णाची भर पडून विषमता अधिकच तीव्र झाली आणि इ. सनाच्या बाराव्या शतकात वर्णाची, जातीची व अस्पृश्यतेची बंधने पराकाष्ठेची कडक होऊन समाज पूर्ण विषम झाला. समता हे लोकशाहीचे आद्य महातत्त्व. असे असताना या पूर्ण विषम समाजात तिचा विकास कसा होणार ?

सम न्यायाचा अभाव
 राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रांतील समता लोकशाहीत अभिप्रेत असते. पण न्यायक्षेत्रातील समता ही लोकशाहीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची होय. न्यायदेवतेसमोर, कायद्याच्या दृष्टीने, सर्व नागरिक सम आहेत हे लोकशाहीचे प्राणतत्त्व आहे. पण भारतीय धर्मशास्त्रकारांनी हे तत्त्व कधीही मान्य केले नव्हते. एकाच अपराधासाठी ब्राह्मणाला एक शिक्षा तर क्षत्रियाला दुसरी आणि शूद्राला त्यांच्या दसपट असे येथले धर्मशास्त्रच होते. अशा स्थितीत न्यायालयीन समता भारतात कधीच निर्माण झाली नाही यात नवल काय ? ' सर्वांना समसंधी आणि कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांना समन्याय हे तत्त्व भारतात कधीही अस्तित्वात नव्हते' असे डॉ. आळतेकर (स्टेट अँड गव्हमेंट इन् एन्शंट इंडिया, पृ. ४१ ), डॉ. वेणीप्रसाद (दि थिअरी ऑफ गव्हर्मेंट इन् एन्शंट इंडिया, पृ. १२०) यांसारख्या पंडितांनी निःसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे. कौटिल्य हा त्यांतल्या त्यात जरा उदारमतवादी होता. पण त्याचे अर्थशास्त्रातील दंडविधानही जातीय पक्षपाताने कलंकित झाले आहे, मानवाची मानव म्हणून तो मुळीच प्रतिष्ठा मानीत नाही, असे वेणीप्रसाद म्हणतात. मानवाला मानव म्हणून जेथे प्रतिष्ठा दिली जाते, त्याची जात, त्याचा वर्ण यांवर ती जेव्हा अवलंबून नसते, तेथेच लोकशाहीचा विकास होऊ शकतो. तशी प्रतिष्ठा मानवाला असावी, म्हणजे त्याची योग्यता त्याच्या गुणकर्मावर अवलंबून ठेवावी, असा एक प्रबळ विचार प्राचीन भारतात प्रारंभीच्या काळी रूढ होत होता. तो बळावत गेला असता तर येथे लोकायत्त संस्थांचा विकास होऊन मोठ्या साम्राज्याप्रमाणेच मोठी प्रजासत्ताके निर्माण झाली असती. पण आपस्तंब, गौतम, मनू, याज्ञवल्क्य इ. धर्मशास्त्रज्ञांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केल्यामुळे त्याची गळचेपी होऊन तो क्षीण होत गेला व अनुवंशावरील अंधश्रद्धा या भूमीत वाढत जाऊन मानवत्वाची प्रतिष्ठा समूळ नाहीशी झाली.