पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१३६
 

करण्याचा अधिकार असून ते कायदे राजाने मान्य करावे असे मनू, याज्ञवल्क्य इ. स्मृतिकारांनी सांगितले आहे.
 प्रस्तुत कालखंडातील स्वायत्त संस्थांचे स्वरूप, कार्य आणि प्रत्यक्ष त्यांचा कारभार याविषयी वरील वर्णनावरून काहीशी कल्पना येईल. यापेक्षा जास्त तपशिलात जाण्याचे आपल्याला कारण नाही. अशा प्रकारच्या स्वायत्त वा लोकायत्त संस्था त्याकाळी असून सार्वजनिक, सामाजिक जीवनाच्या बहुविध क्षेत्रांत त्या जबाबदारीने कारभार करीत असत, एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे. सांस्कृतिक इतिहासात तत्कालीन शासनाचा विचार करताना, लोकांना स्वातंत्र्य कितपत होते, त्यांच्या कार्यशक्तीला, प्रजेला, बुद्धिमत्तेला राज्यकारभारात अवसर कितपत होता, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आणि त्या दृष्टीनेच वरील आढावा घेतला आहे. त्यावरून समाजाच्या शासकीय कारभारात प्रजाजनांना विपुल अवसर होता व त्यांच्या कर्तृत्वाच्या विकासाला अवश्य त्या स्वायत्त संस्था या दीड हजार वर्षांच्या काळात अव्याहत चालू होत्या असे दिसून येते.

दोन कालखंड
 गेल्या पन्नास पाऊणशे वर्षांत नवीन उपलब्ध झालेल्या साधनांच्या आधारे अनेक भारतीय पंडितांनी भारताचा प्राचीन व अर्वाचीन काळचा इतिहास लिहिला आहे. डॉ. भांडारकर, डॉ. मुजुमदार, डॉ. मुकर्जी, डॉ. आळतेकर, चिंतामणराव वैद्य, म. म. मिराशी, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. जयस्वाल ही नावे या क्षेत्रात विख्यात आहेत. यांतील बहुतेक सर्व पंडितांनी प्राचीन काळापासून इ. हजारबाराशेपर्यंतचा एक व त्यानंतरचा ब्रिटिश येईपर्यंतचा दुसरा असे भारताच्या इतिहासाचे दोन कालखंड करून विवेचन केले आहे. त्यांच्या मते पहिला कालखंड वैभवाचा, उत्कर्षाचा, समृद्धीचा, विक्रमाचा, स्वातंत्र्याचा, पुरुषर्थाचा व कर्तृत्वाचा होता; आणि दुसरा कालखंड हा दारिद्र्य, अवनती, पराभव, पारतंत्र्य, दौर्बल्य व कर्तृत्वहीनता या दुर्लक्षणांनी लांच्छित असा होता. पहिल्या कालखंडात गणित, रसायन, पदार्थविज्ञान, ज्योतिष, राजनीती, समाजशास्त्र इ. शास्त्रे, नर्तनगायनादी कला, कृषी, व्यापार, कारागिरी हे धनोत्पादनाचे उद्योग, काव्यनाटकादी साहित्य आणि धर्म व तत्वज्ञान यांतील अभिनव सिद्धान्त यांचा दीर्घकालपर्यंत उत्कर्ष होत होता. दुसऱ्या कालखंडात यांतील बहुतेक पुरुषार्थाचा ऱ्हास झालेला दिसतो स्वातंत्र्य नाही, विद्या नाही, कला नाही, धन नाही, शास्त्रे नाहीत, तत्त्वज्ञान नाही असा हा वैराण काल होता.

कर्तृत्वाची प्रेरणा
 या अधःपाताची कारणमीमांसाही अनेक पंडितांनी केली आहे. जातिभेद, निवृत्तिवाद, शब्दप्रामाण्य, संघटनेचा अभाव इ. अनेक कारणे त्यांनी दिली आहेत. त्याबरोबरच या स्वायत्त संस्थांचा ऱ्हास हेही कारण काही पंडितांनी दिलेले आहे. अर्थातच आधीच्या