पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३५
स्वायत्त संस्था आणि लोकसंघटना
 

भारताच्या इतिहासात ग्रामसभा हीच खरी स्वायत्त संस्था, असे म्हणावयाचे हे कारण आहे. या ग्रामसभेकडे करवसुली, न्यायदान, आणि ग्रामाचे संरक्षण ही महत्त्वाची कामे असत. संरक्षणासाठी त्या काळी गावच्या ग्रामपतीला म्हणजे पाटलाला फार दक्ष राहावे लागत असे. कारण गावागावातील चकमकी, दरोडे, लुटारूंच्या टोळधाडी ही बाब तेव्हा नित्याची असे. यामुळे शूर, लढवय्या पुरुषालाच ही महत्त्वाची जागा देण्यात येई. त्याच्या मदतीला गावचे लष्करही नित्य तयार असे. दक्षिणेतील अशा स्थानिक लढायांची वर्णने हल्ली विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. या लढायांत कामास आलेल्या शूर पुरुषांच्या नावे उभारलेले 'वीरगळ' नावाचे पुतळे अजूनही ठायी ठायी आढळतात. यावरून गावासाठी लढण्यात व वेळी मरण पत्करण्यात भूषण आहे ही निष्ठा, ही भूमिभक्ती मर्यादित स्वरूपात का होईना पण तेव्हा जोपासली जात असे असे दिसून येते. संरक्षण, न्यायदान व करवसुलीप्रमाणेच गावातील उद्योग- धंदे, गावची शेती, तिच्यासाठी लागणारे पाटबंधारे, तळी, विहिरी, गावचे रस्ते, गावातली देवळे, त्यातील देवांची पूजाअर्चा, गावच्या मुलांचे शिक्षण, गावातील देण्याघ्येण्याचे व्यवहार या सर्वांची जबाबदारी या ग्राममहत्तरांच्या शिरावर असे आणि शतकानुशतके ही जबाबदारी ते चोख पार पाडीत असत असे पंडितांचे मत आहे. आणि यामुळे आमची खेडी म्हणजे त्या काळी स्वतंत्र प्राजके, वा गणराज्ये (रिपब्लिक्स् ) होती असे आज महात्माजी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांसारखे थोर पुढारी म्हणतात.

व्यावसायिक संघ
 ग्राम, भुक्ती, विषय व राष्ट्र यांच्या स्थानिक स्वराज्याप्रमाणेच व्यापारी, शेतकरी, कारागीर, वेदवेत्ते ब्राह्मण, यांच्याही अनेक स्वायत्त संस्था त्या काळी महाराष्ट्रात असत. श्रेणी, पूरा, गण, संघ अशा नावांनी त्या प्रसिद्ध होत्या आणि राज्याच्या शासनात वरील स्थानिक स्वायत्त संस्थांप्रमाणेच या व्यावसायिक संस्थांनाही फार महत्त्व होते. व्यापाऱ्यांच्या श्रेणी तर फार प्रबल असत. त्यांना स्वतंत्र सेना ठेवण्याचा अधिकार असून कोठे कोठे तर व्यापारी संघांची नाणी पण असत. व्यापारातून मिळालेला पैसा, प्रवासामुळे आलेले व्यवहारचातुर्य आणि हाताखाली असलेल्या स्वतंत्र सेना यांमुळे केन्द्रीय व स्थानिक कारभारावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचे वर्चस्व असल्यास नवल नाही. महाभारतात कोणत्या वर्णाचे किती मंत्री असावे हे सांगताना चार ब्राह्मण, अठरा क्षत्रिय आणि एकवीस वैश्य मंत्री असावे असे सांगितले आहे. त्यातील इंगित हेच असावे. लक्ष्मेश्वर, मुलगुंड, मिरज, कोल्हापूर येथे सापडलेल्या कोरीव लेखांवरून असे दिसते की काही व्यापारी संघांचे २००० पर्यंत सभासद असून तीनशेचारशे गावांतून त्यांच्या शाखा पसरलेल्या असत. प्रत्येक संघांची एक कार्यकारिणी असून चार, नऊ, पंधरा असे तिचे सभासद असत. या संघांना आपल्यापुरते स्वतंत्र कायदे