पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२५
राजसत्ता
 


कार्याचा व्याप
 प्राचीन काळच्या राजसत्तांविषयी अलीकडे एक मोठा गैरसमज लोकांत रूढ झालेला आढळतो. तो हा की त्या काळचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करणे, चोरा- चिलटांचा बंदोबस्त करणे, आणि करवसुली करणे एवढेच आपले कर्तव्य मानीत असत. गेल्या शतकात युरोपात सर्वत्र भांडवलशाही सत्तारूढ होती. तिच्या अर्थशास्त्रात वरील कर्तव्यावाचून राजाने कोणत्याच व्यवहारात हस्तक्षेप करता कामा नये, असा महत्त्वाचा सिद्धान्त होता आणि तो मानलाही जात असे. त्या काळातच भारताचा युरोपीय राज्यशास्त्राशी परिचय झाला. त्यामुळे वरील गैरसमज रूढ झाला असावा. शिवाय अनेक युरोपीय इतिहासकारांनी प्राचीन पौर्वात्य व भारतीय राजसत्तांविषयी, 'साम्राज्ये म्हणजे केवळ करवसुलीच्या संस्था होत्या,' अशी विधाने केलेली आहेत. पण ही विधाने अगदी भ्रांत आहेत हे म. म. काणे ( धर्मशास्त्राचा इतिहास, ३ रा खंड, पृ. १५ ), डॉ. अ. स. आळतेकर ( स्टेट अँड गव्हर्मेन्ट इन् एन्शंट इंडिया, पृ. ३६ ) यांसारख्या थोर पंडितांनी दाखवून दिले आहे. डॉ. आळतेकर म्हणतात, कौटिल्याचे अर्थशास्त्र व महाभारत या ग्रंथांनी राजाची जी कर्तव्ये म्हणून सांगितली आहेत ती पाहता, मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगांच्या विकासाची जबाबदारी त्या काळी शासनावर होती, असे दिसते. गेल्या शतकातील युरोपातील 'लेसेफेअरचे' म्हणजे अलिप्ततेचे तत्त्वज्ञान भारतात मुळीच मान्य झालेले नव्हते. प्रजेच्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्वच अंगांचा उत्कर्ष साधणे हे शासनाचे धर्मशास्त्रप्रणीत कार्य होते. विद्यापीठे, गुरुकुले स्थापून, विद्वानांचा परामर्श घेऊन विद्येला उत्तेजन देणे, विश्रामशाळा, अनाथालये, रुग्णालये बांधून दीनदुःखितांना आश्रय देणे, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता धरणे, पाटबंधारे, कालवे बांधून कृषिधन व गोधन यांची जोपासना करणे, दुष्काळ, टोळधाड, महापूर या आपत्तींचे निवारण करणे, व्यापार, उद्योग यांना उत्तेजन देणे, भाववाढ, शोषण, पिळणूक होणार नाही अशी दक्षता घेणे, नव्या वसाहती वसवून नवीन जमिनी लागवडीस आणणे, अरण्ये, खाणी यांची जपणूक करणे, धर्माचे व नीतीचे नियम प्रजाजन यथायोग्य रीतीने पाळतील अशी व्यवस्था करणे, रस्ते, धर्मशाळा बांधून प्रवासाची व वाहतुकीची उत्तम सोय करणे ही सर्व राजशासनाचीच कामे होती असे त्या काळचे धर्मशास्त्र सांगते (पृ. ३५, ३६ ). आणि सातवाहनांपासून यादवापर्यंतचे सर्व राजवंश ही कर्तव्ये पार पाडण्याची अत्यंत कसोशी करीत असत हे आता सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे. त्या राजवंशांच्या या क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्याचे विवेचन त्या त्या प्रकरणात येणारच आहे. त्यामुळे येथे तो तपशील देत नाही. त्या राजवंशांची राजकीय संस्कृती अतिशय उच्च दर्जाची होती एवढेच सामान्यपणे पाहात सध्या आपण पुढे जाऊ. अनियंत्रित राजसत्ता हाती असूनही या राज्यकर्त्यांनी विवेकाने, न्यायाने, धर्माने