पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२६
 

राज्य करून प्रजेला सुखी ठेविले, प्रजामुखे सुखं राज्ञः । हा दण्डक आपण होऊन पाळला, हे राजकीय क्षेत्रातले मोठे वैभव आहे. त्याचेच दर्शन सध्या आपण घेत आहो.
 डॉ. काशीप्रसाद जयस्वाल आपल्या 'मनू आणि याज्ञवल्क्य' या ग्रंथात म्हणतात, सातवाहनांच्या साम्राज्या-समृद्धीचे व त्यांच्या उदार धोरणाचे पडसाद याज्ञवल्क्य स्मृतीत स्पष्ट ऐकू येतात. त्या काळी पश्चिमेबरोबरचा व्यापार कळसाला पोचला होता. व्यापारी, कर्मचारी यांचे सहकारी संघ हे राज्याचे मोठे भूषण होते. ब्राह्मणांचे अधिक हक्क या साम्राज्यात बरेच कमी केले होते. आणि स्त्रीला मोठी प्रतिष्ठा तेथे असे. ' ( प्रस्तावना, पृ. २१ ).

वाकाटक
 सातवाहनांच्या नंतरचे राजघराणे म्हणजे वाकाटकांचे होय. त्यांच्या विषयी म. म. मिराशी म्हणतात, 'वाकाटकांचे राज्यशासन कार्यक्षम असून त्यायोगे प्रजाजनांस समृद्धी, शांतता व सुव्यवस्था याचा लाभ झाला होता, असे दिसते. अजंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेखात म्हटल्याप्रमाणे वाकाटकांचे सचिव हे आपल्या उत्कृष्ट शासनाच्या योगे प्रजाजनांना त्यांचे माता-पिता व मित्र यांसारखे वाटू लागले. त्यांनी देशाचा राज्यकारभार न्यायाने चालविला व आपल्या गुणांनी, पुण्योपार्जनाने आणि कीर्तीने स्वतःस उज्ज्वल केले. रघुवंशात, विदर्भ देशाचे 'सौराज्यरम्य' व 'समृद्ध' असे वर्णन करताना, कविकुलगुरू कालिदास स्वकालीन वाकाटकनृपतींच्या उत्कृष्ट राज्यशासनाची प्रशंसा करीत होता, असे वाटल्याशिवाय राहात नाही. ' ( वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, पृ. ७९ ). याच ग्रंथात अन्यत्र मिराशी म्हणतात, 'त्या काळी सर्व सत्ता राजाच्याच हाती असे. पण त्या सत्तेला स्मृतींचे नियंत्रण असे. तत्कालीन राज्यकारभार केवळ स्वेच्छेनुसार किंवा जुलमी होता असे नाही. धर्मशास्त्रांनी भारतीय राजांना लोककल्याणकारी राज्याचे ध्येय सदैव उपदेशिले होते. कालिदासादी संस्कृत कवींनी आपल्या काव्यनाटकात त्याचाच पुरस्कार केला आहे. वाकाटकांनी हे ध्येय कृतीत आणण्याचा प्रयत्न केला होता, असे दिसते. पृथ्वीषेण पहिला, हरिषेण, देवसेनाचा सचिव हस्तिभोज यांच्या शिलालेखांवरून ही गोष्ट स्पष्ट होते.' ( पृ. ७१ ). सातवाहनांप्रमाणेच वाकाटकांनीही आपली सत्ता ईश्वरदत्त असल्याचा दावा कधी केला नाही. ही गोष्ट अकरणात्मक असली तरी तिला फार अर्थ आहे. जुलमी राजांना आपण कोणालाही जबाबदार नाही, कारण आपली सत्ता ईश्वरदत्त आहे हे तत्त्वज्ञान फार प्रिय असते व त्याची त्यांना फार जरूर असते. सातवाहन व वाकाटक या दोन्ही वंशांनी त्याचा अवलंब केला नाही हे त्यांना फारच भूषणावह आहे.

चालुक्य
 वाकाटकांनी इ. स. २५० ते ५५० असे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले.