पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२३
राजसत्ता
 

होते याचे विवरण केले आहे. ते म्हणतात, त्या काळी सर्व राजांपाशी हल्लीप्रमाणे खडी फौज नसे. आणि दुसरे असे की सामन्त, मांडलिक, ग्रामे, नगरे यांना या कामासाठी सेना उभारणे सहज शक्य असे. मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सेनापती यांना अशा सेनांचे साह्य घेऊन राजाला पदच्युत करणे आज वाटते तितके अवघड नव्हते. मागील उदाहरणे पुराणातील आहेत. पण ऐतिहासिक काळातही अशी उदाहरणे घडलेली आहेत. मौर्य- वंशातील शेवटचा राजा बृहद्रथ, शुंगांचा शेवटचा राजा देवभूमी आणि राष्ट्रकूटांचा गोविंद ४ था याला सामन्त व सेनापती यांनी अशाच तऱ्हेने पदच्युत केल्याचे इतिहास सांगतो (पृ. ६८-६९ ) तेव्हा हे शेवटचे नियंत्रण बरेच प्रभावी असले पाहिजे, निदान राजांना कर्तव्यच्युत होताना, उन्मार्गगामी होताना, दहशत वाटावी इतपत त्यात अर्थ असला पाहिजे यात शंका नाही. अर्थात काही घटनात्मक नियंत्रणे असती तर फार चांगले झाले असते, हे आळतेकरांनाही मान्य आहे. पण ग्रीस व रोम या प्राचीन देशांचा इतिहास वाचणारांना त्या मागल्या काळी घटनात्मक नियंत्रणाचा कितपत उपयोग झाला असता, याबद्दल शंका येणे स्वाभाविक आहे. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रकारांनी तसली बंधने निर्माण केली नव्हती हे खरे आहे. पण त्याबरोबर त्यांनी राजसत्तेवर नियंत्रणे ठेवून ती अन्यायी, जुलमी, मदांध न होऊ देण्याची यावत शक्य व्यवस्था राजशास्त्रात करून ठेविली होती हेही खरे आहे.

प्रजेचा पिता
 आणि भारताचा इतिहास पाहताना, हे राजशास्त्र केवळ कागदावरच राहिले होते किंवा स्मृतिग्रंथांच्या ताडपत्रातच पडून राहिले होते, असे दिसत नाही. राजसत्तेवर घातलेल्या नियंत्रणांचा प्रत्यक्षात उपयोग झालेला आढळतो. इ. स. पू. ६ व्या शतकात शैशुनागवंशाचे मगध साम्राज्य स्थापन झाले. तेव्हापासून इ. सनाच्या तेराव्या शतकापर्यंत भारताच्या भिन्न भिन्न प्रांतांत अनेक राज्ये, साम्राज्ये होऊन गेली. ती साम्राज्ये अनेक वंशांची, अनेक वर्गीय राजांची, अनेक धर्मपंथीयांची होती आणि काही वंशांची साम्राज्ये दोन, तीन, चार शतकांइतकी दीर्घकालपर्यंत चालू होती. असे असूनही एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात, इतक्या विस्तीर्ण कालखंडात अत्यंत जुलमी, अनाचारी, उन्मत्त, अनन्वित अत्याचार करणारे, प्रजेला पिळून काढणारे, नराधम, नरराक्षस असे राजे अपवादरूपानेच सापडतात. शैशुनागवंशातील एकदोन राजे आणि नंदवंशातील धनानंदासारखे एकदोन राजे हे काहीसे असे होते. काश्मिरात मात्र असे नरराक्षस बरेच निघाले. पण एवढ्या राजनामावळीत हे अपवादच होत. चिंतामणराव वैद्य आपल्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा समारोप करताना म्हणतात की 'राजा म्हणजे प्रजेचा पिता होय, असे हिंदु धर्मशास्त्राने सांगितले असून हिंदू राजांचा इतिहास पाहता, ते राजे ही पितृकल्पना प्रत्यक्षात आणीत असे दिसते. ते आपल्या प्रजेवर सहसा जुलूम करीत नसत. मध्ययुगीन लेखांत जुलमी राजांचा उल्लेख- काश्मीर वजा जाता - फारच