पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२२
 

प्रजापालन वेतनम् ।' कर म्हणजे राजाला प्रजापालनासाठी दिलेले वेतनच होय असे नारदस्मृतीचे मत आहे. महाभारतातील शांतिपर्वात वेतन हाच शब्द वापरून हा विचार मांडला आहे.
 अशा धर्मशास्त्राला अनुसरून जो राज्य करणार नाही, जो प्रजेचे रक्षण करणार नाही, न्यायदानात पक्षपात करील, असह्य कर लावील त्या राजाचा कुलक्षय होईल, तो नरकास जाईल अशी भीतीही धर्मशास्त्रज्ञांनी घालून ठेवलेली आहे. असल्या भीतीला आज फारसे महत्त्व नसले तरी आजच्यापेक्षा परलोकश्रद्धा अनेक पटींनी जास्त प्रभावी असल्यामुळे त्या काळी तिला बराच अर्थ होता. तरीही धर्मशास्त्रकारांनी तेवढ्यावरच सर्व अवलंबून ठेविले नाही. त्यांनी यापेक्षाही जास्त प्रभावी असे नियंत्रण राजसत्तेवर घालून ठेविले होते.

प्रजेचे अधिकार
 जो राजा प्रजेचे रक्षण करणार नाही, न्याय देणार नाही, पण कर मात्र चोपून वसूल करील अशा राजाला प्रजेने, नागरिकांनी संघटित होऊन पदच्युत करावे, किंवा ठारही मारावे, असा स्वच्छ आदेश त्यांनी देऊन ठेविला आहे. ' तं वै राजकलिं हन्युः प्रजाः सन्नह्य!' 'स संहत्या निहंतव्यः!' 'वध्यो लोकस्य धर्मः !' अशी वचने महाभारतात आहेत. शुक्रनीतिसारामध्ये इतकी कडक उपाययोजना सांगितलेली नाही; पण 'अधार्मिक, राष्ट्रविनाशक राजाला पुरोहिताने राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या साह्याने पदच्युत करावे व त्याच्याच कुळातल्या दुसऱ्या योग्य पुरुषाला गादी द्यावी,' असे सांगितले आहे. मनू, याज्ञवल्क्य यांनीही अशा राजाला पदच्युत करण्याचा अधिकार प्रजेला दिलेला आहे ( म. म. काणे, हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र, खंड ३ रा, पृ. २५-२७ ).

शक्याशक्यता
 हा उपाय अगदी निर्णायक आहे व हे नियंत्रण अत्यंत प्रभावी आहे यात शंका नाही. पण ते कितपत व्यवहार्य आहे असा प्रश्न उद्भवतो. मदांध, जुलमी, अनन्वित अत्याचार करणाऱ्या व सर्व लष्करी बळ ज्याच्या हाती आहे अशा राजाविरुद्ध संघटित होणे व त्याला पदच्युत करणे हे मागल्या काळी प्रजेला कितपत शक्य होते अशी शंका येणे साहजिक आहे. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'स्टेट अँड गव्हर्मेन्ट इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथात याचा विचार करून आज वाटते तितके ते त्या काळी अशक्य नव्हते असे आपले मत दिले आहे. प्रथम त्यांनी नहुप, सुदास, सुमुख, निमी अशा राजांना देहान्त शिक्षा दिल्याची प्राचीन काळची उदाहरणे दिली आहेत, नंतर सच्चंकिर व पदकुसलमानव या जातकात, प्रजेने दुष्ट राजांना ठार मारल्याची अनेक उदाहरणे असल्याचे सांगितले आहे; आणि नंतर त्या काळी हे कसे व्यवहार्य