पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२१
राजसत्ता
 

हे या पंडितांना मान्य आहे; पण म्हणजे राजसत्ता सर्वस्वी अनियंत्रित होती असे मात्र नव्हे.

धर्मशास्त्र
 राजसत्तेवर त्या काळी पहिले नियंत्रण होते ते धर्मशास्त्राचे होय. सर्व प्राचीन धर्मशास्त्रज्ञांच्या मते राजा हा केवळ कार्यकारी सत्ताधीश होता. कायदे करण्याचा अधिकार त्याला मुळीच नव्हता. वर्णाश्रमधर्माचे, न्यायदानाचे, करवसुलीचे व एकंदर सर्व सामाजिक व्यवहारांचे कायदे स्मृतिकारांनी रचलेले असत. राजाने फक्त त्यांचा अंमल करावयाचा असे. इतकाच त्याचा अधिकार. कायदे करण्याचा अधिकार नाही म्हणजे राजसत्तेवर फार मोठे नियंत्रण पडले हे उघडच आहे. आता हे बंधन राजाने पाळले नाही तर काय करावयाचे, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण धर्मशास्त्राचे बंधन हे अखेरीस विवेकाचे बंधन होय. आणि जो राजा विवेकहीन आहे, मदांध, उन्मत्त आहे, त्याच्या बाबतीत खरा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा या धर्मशास्त्रप्रणीत नियंत्रणाचा उपयोग काय, असे वाटण्याचा संभव आहे. पण आपण हे ध्यानात ठेविले पाहिजे की समाजात जे तत्त्वज्ञान रूढ झालेले असते आणि जे लोकांना वंद्य झालेले असते त्याचा प्रभाव फार मोठा असतो. प्राचीन काळी काय किंवा अर्वाचीन काळी काय, अंतिम निर्णय हा लोकसामर्थ्यानेच व्हावयाचा. लोक उदासीन असले, असंघटित असले व दुबळे असले तर घटनात्मक बंधनेही कागदावरच राहतात हे अर्वाचीन इतिहासातही आपण पाहात आहो. आणि लोक जागृत असले, समर्थ असले तर घटना दूर सारूनही किंवा बदलून घेऊन सत्ताधीशांना नमवू शकतात हेही आपल्याला दिसत आहे. तेव्हा लोकमतात कोणते तत्त्वज्ञान रूढ आहे याला, सर्वस्वी नव्हे तरी महत्त्व आहे. यासाठी प्रथम राजसत्तेविषयी धर्मशास्त्रज्ञांनी लोकांत कोणते तत्वज्ञान दृढमूल करून टाकले होते हे आपण पाहू. आणि मग प्रत्यक्षात त्याचा कितपत उपयोग होत असे याचा विचार करू.

स्वामिरूप दास
 यासाठी धर्मशास्त्र पाहू लागताच, राजाला कायदे करण्याचा अधिकार नाही, हे त्यातील पहिले तत्त्व आपल्या दृष्टीस पडते. दुसरे तत्त्व असे की राजाला सत्ता प्राप्त होते ती त्याने प्रजेशी काही करार केल्यानंतरच प्राप्त होते. 'मी प्रजेचे रक्षण करीन, योग्य न्याय देईन, अन्याय्य कर लादणार नाही, जुलूम करणार नाही,' अशी प्रतिज्ञा राजाला राज्याभिषेकाच्या वेळी करावी लागते. आणि काही शास्त्रज्ञांनी तर असे मत मांडले आहे की राजा हा प्रजेचा सेवक असून प्रजा त्याला कर देते ते त्याचे वेतन असते. 'स्वामिरूपस्तु प्रजानां दास्यत्वे नृपः कृतः ।' ब्रह्मदेवाने स्वामिरूपाने राजा हा प्रजेचा दास–सेवकच निर्माण केला आहे, असे शुक्रनीती म्हणते; तर, 'बलिः स तस्य विहितः