पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२०
 


शस्त्रबलाने निर्णय
 वारशाच्या युद्धाप्रमाणेच दोन घराण्यांत राजसत्तेसाठी झालेल्या युद्धापासून लोक अलिप्तच होते. सामन्य जन तर अलिप्त होतेच, पण वर सांगितलेल्या व्यापारी, ब्राह्मण, नगरजन व ग्रामीण जन यांच्या ज्या लोकायत्त संस्था त्या काळात होत्या त्याही राजत्तेविषयीच्या संघर्षापासून अलिप्त होत्या. सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव इतक्या घराण्यांनी क्रमाने या कालखंडात महाराष्ट्रावर राज्य केले. पण यातील प्रत्येक घराण्याने शस्त्र, सेना, रणनीती, राजनीती, थोर पराक्रमी राजपुरुष या बळावरच राजसत्ता जिंकलेली आहे. वरील संस्थांची अनुमती, संमती, पाठिंबा यांचा त्यात कोठेही केव्हाही संबंध आल्याचे दिसत नाही. त्या संस्था आपापल्या क्षेत्रात या काळात कार्य करीत होत्या; महाराष्ट्रीय जीवनात त्यांना महत्त्वाचे स्थानही प्राप्त झाले होते, याविषयी वाद नाही. पण राजकीय क्षेत्रात राजसत्तेविषयीच्या निर्णयात किंवा राजसत्तेने केलेल्या संधिविग्रहादी निर्णयांत त्यांना काही मत होते, महत्त्वाचे स्थान होते असे म्हणता येत नाही.

राजसत्तेवरील नियंत्रणे
 पण लोकमताला किंवा लोकमतानुवर्ती असलेल्या संस्थांना राजकीय क्षेत्रात स्थान नसले तरी त्या काळी राजसत्ता सर्वस्वी अनियंत्रित होती असे मात्र नाही. घटनात्मक अशी कसलीही बंधने नव्हती हे खरे; पण इतर अनेक प्रकारची बंधने तिच्यावर होती. आणि राजसत्ता नियंत्रित आहे याला राजकीय संस्कृतीच्या आणि एकंदर जीवनाच्या दृष्टीने फार महत्त्व असल्यामुळे या नियंत्रणाचा विचार करणे अगत्याचे आहे.
 राजा हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असतो, त्याच्या ठायी अनेक देवता वास करीत असतात, त्याला राजपद प्राप्त होते ते पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे व ईश्वरी कृपेने प्राप्त होते, असा एक समज भारतीय जनतेत अनेक शतके रूढ झालेला होता. ब्राह्मण- ग्रंथ, धर्मसूत्रे, मनुयाज्ञवल्क्यादिकांच्या स्मृती व राजशास्त्रावरचे इतर अनेक ग्रंथ यांत राजाच्या ठायी असलेल्या दैवी गुणसंपदेचे वर्णन केलेले आहे हे खरे; पण त्यावरून राजसत्ता ही प्राचीन शास्त्रज्ञांच्या मते ईश्वरदत्त होती असे मुळीच ठरत नाही. युरोपच्या व इंग्लंडच्याही इतिहासात ईश्वरदत्त सत्तेचे तत्त्व काही काळ रूढावले होते. गेली शेदीडशे वर्षे आपण भारतीय त्या इतिहासाचा अभ्यास करीत आहोत. त्यामुळे तेच तत्त्व प्राचीन काळी आपल्याकडेही शास्त्रज्ञांनी सांगितले असावे असा समज ब्रिटिश सत्तेनंतरच्या काळातही दृढ होऊन बसला. पण हा समज अगदी निराधार आहे हे म. म. काणे, डॉ. अ. स. अळतेकर, चिंतामणराव वैद्य, डॉ. जयस्वाल, रमेशचंद्र मुजुमदार या पंडितांनी आपल्या ग्रंथांतून स्पष्टपणे दाखवून दिले आहे. भारतात प्रातिनिधिक राजकीय संस्था नव्हत्या व राजसत्तेवर कोणतीही घटनात्मक बंधने नव्हती