पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
११६
 


आर्यीकरणाचा इतिहास
 या कालखंडाचा महाराष्ट्राचा इतिहास पाहताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवली पाहिजे की तात्विक दृष्टीने पाहता या काळात अखिल भारताच्या संस्कृतीहून महाराष्ट्राची संस्कृती निराळी नव्हती. तत्त्वज्ञान, धर्म, राजनीती, अर्थशास्त्र या विषयांवर जी ग्रंथरचना या काळात झाली, ती बव्हंशी उत्तरेतच झाली. पण त्या ग्रंथांच्या रचनेच्या काळापासूनच अखिल भारतावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. आणि कमीअधिक प्रमाणात ते आजही अबाधित असेच आहे. अखिल भारताच्या संस्कृतीला एकरूपता प्राप्त झाली ती या ग्रंथांच्यामुळेच झाली. महाराष्ट्र अर्थातच याला अपवाद नाही. किंबहुना दख्खनचा या काळचा सांस्कृतिक इतिहास म्हणजे दक्षिणेच्या आर्यीकरणाचाच इतिहास होय असे पंडितांचे मत आहे. आंध्र विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक गुटी वेंकटराव म्हणतात, राज्यकारभार, सामाजिक व अर्थिक जीवन, धर्म, तत्त्वज्ञान, कला, साहित्य ही दक्षिणेच्या जीवनाची सर्व अंगोपांगे या काळात आर्य संस्कृतीच्या मुशीत ओतली गेली. वैदिक ऋषी, मौर्य शासनाचे अधिकारी व बौद्ध भिक्षू यांनी आर्य धर्म, तत्त्वज्ञान व संस्था यांची बीजे आधीच येथे पेरली व रुजविली होती. सातवाहनांनी सहजगत्याच त्यांचा स्वीकार करून विकास घडविला (अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, संपादक, डॉ. यजदानी, पृ. १३१ ). पुढील राजवंशासंबंधी तर पंडितांनी निःसंदेहपणे अशी विधाने केली आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील राजशासनाचे पुढील विवेचन त्या अखिल भारतीय कीर्तीच्या ग्रंथांच्या आधारेच केले पाहिजे. प्रत्यक्ष इतिहास पाहताना मात्र महाराष्ट्रातील राजवंशांच्या चरित्रांतील घटनांच्या आधारेच विवेचन केले जाईल.

राजसत्ता
 महाराष्ट्रातील राजशासनाचे रूप पाहू लागताच त्याचे पहिले लक्षण आपल्या ध्यानात येते ते हे की हा हजार दीडहजार वर्षांचा काळ प्रारंभापासून अखेरपर्यंत केवळ राजसत्तेचा काळ होता. अलीकडच्या संशोधनाअन्वये भारतात प्राचीन काळी ग्रीसप्रमाणे अनेक गणराज्ये वा प्राजके प्रस्थापित झालेली असून त्यांनी आपला राजकीय प्रपंच अत्यंत यशस्वीपणे चालविला होता. डॉ. जयस्वाल यांच्या मते इ. पू. १००० च्या सुमारास गंगायमुनांची अंतर्वेदी सोडली तर आर्यावर्तात सर्वत्र गणराज्ये होती. मौर्य सम्राटांनी यांतली अनेक गणराज्ये आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकली. तरी मौर्यांच्या नंतरही इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत भारतात अनेक गणराज्ये चालत होती. गुप्त साम्राज्यात मात्र त्यांचा पूर्ण ऱ्हास झाला. या गणराज्यांविषयी व भारतातील राजसत्तांवरील लोकनियंत्रणाविषयी पुष्कळच वाद आहेत. पण त्या वादांत शिरण्याचे आपल्याला कारण नाही. कारण ज्या कालखंडाचा आपण