पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११५
राजसत्ता
 

सर्व धर्मांचा समावेश होतो' ही महाभारतातील वचने मागे दिलीच आहेत. समाजाच्या शासनाचे जे शास्त्र त्याला प्राचीन काळी राजशास्त्र, अर्थशास्त्र, दण्डनीती, राजधर्म अशी नावे होती. यांतील दण्डनीती हा शब्द लक्षणीय आहे. प्रजांचे नियंत्रण, शासन करण्याची शक्ती या अधी दण्ड शब्द येथे वापरलेला आहे. आणि या दण्डावाचून समाजाचा कोणताही व्यवहार शक्य होणार नाही, हे प्राचीन शास्त्रज्ञांनी पुनः पुन्हा सांगितले आहे. 'विद्वान लोक दण्ड हाच धर्म असे मानतात', असे मनूने म्हटले आहे. तत्त्वज्ञान, वेदविद्या व वार्ता ( अर्थव्यवहार ) या शास्त्रांना कौटिल्याच्या मते फार महत्त्व आहे. पण या शास्त्रांना दण्डानेच स्थैर्य लाभते व त्यांचा विकास होतो, असे तो म्हणतो. दण्डनीती हाच जगाचा आधार असून तिच्या अभावी समाज उद्ध्वस्त होईल, असे महाभारतकार म्हणतात. मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, मत्स्यपुराण, कामंदकीय नीतिसार इ. सर्व प्राचीन ग्रंथांत दण्डनीतीची अशीच महती गायिली आहे. दण्ड हाच धर्म हे मनुवचन वर दिले आहे भगवद्गीतेत तर दण्ड हा परमेश्वरच होय, असे म्हटले आहे. ' दण्डो दमयतां अस्मि ।' शासकांचा दण्ड मीच होय, असे भगवान म्हणतात. यावरून सर्व संस्कृतीचा पाया राजशासन हा आहे याविषयी प्राचीन शास्त्रवेत्यांच्या मनात कसलाही संदेह नव्हता असे दिसून येईल.

प्राचीन ग्रंथ
 राजशासनाचे हे अनन्यसाधारण महत्त्व भारतात मान्य झाले होते म्हणूनच प्राचीन काळी येथे या विषयावर विपुल ग्रंथरचना केली गेली. महाभारतात प्राचीन काळच्या राजनीतिशास्त्राचा थोडक्यात इतिहास दिला आहे. बृहस्पती, विशालाक्ष, शुक्र, देवेंद्र, मनू, भारद्वाज, गौरशिरा इ. या क्षेत्रातील ग्रंथकारांची नावे सांगून त्यांना तेथे राजधर्मप्रणेते असे म्हटले आहे. कौटिल्याने आपल्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात वातव्याधी, कौणपदंत, पिशुन, भारद्वाज, पराशर, विशालाक्ष, उशना, बहुदंती अशा अनेक राजनीतिशास्त्रज्ञांचा उल्लेख करून त्यांची वचने देऊन त्यांची चर्चाही केली आहे. शिवाय आपल्या गुरूचा आचार्य म्हणून वारंवार उल्लेख करून त्यांच्याही मतांची चर्चा तो करतो. यावरून त्या काळी हा विषय पंडितांना व समाजालाही अत्यंत महत्त्वाचा वाटत होता यात शंका नाही.
  कौटिल्याच्या अर्थशास्त्रानंतरही पुढील काळात कामंदकीय नीतिसार, नीतिवाक्यामृत, शुक्रनीती इ. ग्रंथ रचले गेले. मनू, याज्ञवल्क्य, बृहस्पती, नारद, पराशर इ. स्मृतिकार व विश्वरूप, मेधातिथी, विज्ञानेश्वर इ. टीकाकार दण्डनीतीची चर्चा करतात. या सर्वांच्या आधारे अर्वाचीन काळात म. म. काणे, म. म. मिराशी, डॉ. जयस्वाल, डॉ. आळतेकर, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. भांडारकर, चिंतामणराव वैद्य, नीलकंठ शास्त्री, डॉ. मुनशी यांनी प्राचीन काळच्या राजशास्त्राची चर्चा केली आहे. तिच्याच आधारे आता महाराष्ट्रातील या कालखंडातील राजशासनाचे स्वरूप काय होते ते पाहू.