पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६.
राजसत्ता
 



 पहिल्या दोन प्रकरणांत महाराष्ट्राच्या अस्मितेचा निश्रय केल्यानंतर पुढील तीन प्रकरणांत इ. पू. २३५ ते इ. स. १३१९ या पहिल्या कालखंडाच्या राजकीय इतिहासाची स्थूल रूपरेषा आपण पाहिली. त्यांतल्याच एका प्रकरणात सातवाहन ते यादव या सहा राजघराण्यांच्या महाराष्ट्रीयत्वाची छाननी करून ती सर्व घराणी निःसंदेह महाराष्ट्रीय होती हे सिद्ध केले. आता या पायावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मंदिर कसे उभारले गेले ते पाहावयाचे आहे. संस्कृती या शब्दाची विवक्षा आपण प्रारंभीच निश्चित केली आहे. संस्कृतीची व्याख्या करणे अवघड असले आणि त्या शब्दाच्या अर्थाविषयी खूप मतभेद असले तरी संस्कृतीच्या स्थूल रूपाविषयी मतभेद नाहीत. धर्म, तत्त्वज्ञान, राजशासन, समाजरचना, अर्थव्यवस्था, विद्या, शस्त्रे, साहित्य, कला हीच संस्कृतीची प्रमुख अंगे होत याविषयी वाद नाही. या विविध अंगांचा विकास कसकसा होत गेला हे पाहणे हाच संस्कृतीचा अभ्यास होय. हाच अभ्यास आता आपल्याला करावयाचा आहे. राजशासनाच्या विवेचनापासून या अभ्यासाला आपण प्रारंभ करू.

दण्डनीती
 राजशासनापासून प्रारंभ करण्याचे कारण उघड आहे. समर्थ व कार्यक्षम राजशासन हा सर्व संस्कृतीचा पाया आहे. त्यावाचून कोणत्याही समाजात संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. 'शस्त्ररक्षित राज्यातच शास्त्रचिंता होऊ शकते', 'राजधर्मात