पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१०२
 

नागभट्ट राजाने त्यांचे आक्रमण मोडून काढून त्यांना परतवून लावले. इ. स. ७३६ साली आरब गुजराथेत उतरले होते. त्याआधी त्यांनी कोकण, कच्छ व सौराष्ट्र जिंकलेच होते आणि आता लाट म्हणजे दक्षिण गुजराथेत ते उतरले होते. पण चालुक्य सामंत पुलकेशी याने त्यांशी मुकाबला करून त्यांचे निर्दाळण केलं. विक्रमादित्य २ रा याने या पराक्रमाबद्दल दक्षिणापथस्वाधार, पृथ्वीवल्लभ अशा पदव्या देऊन पुलकेशीचा मोठा गौरव केला.
 विक्रमादित्यामागून त्याचा पुत्र कीर्तिवर्मा २ रा हा गादीवर आला. पण या सुमारास चालुक्यांचे सामंत राष्ट्रकूट उदयास येत होते. पल्लव, पांड्य, चोल, गंग, अलूप यांशी सतत दोनशे वर्षे चालुक्यांनी लढाया चालू ठेविल्यामुळे त्यांची शक्ती क्षीण झाली होती. राष्ट्रकूटांचा जोम नवीन होता. त्यात दंतिदुर्गासारखा समर्थ नेता त्यांना लाभला. त्यामुळे त्यांनी उठाव करून चालुक्यराजांचा पराभव केला आणि त्यांची राजश्री हिरावून घेतली. त्यामुळे इ. स. ७५३ च्या सुमारास या घराण्याचा अस्त झाला.

एकसत्ताक दक्षिणापथ
 सम्राट हर्षवर्धनानंतर भारतात साम्राज्यकर्ता पुरुष झाला नाही, असे पाश्चात्य इतिहास पंडितांनी लिहून ठेविले आहे. व्हिन्सेंट स्मिथ याने हे मत मांडून, ब्रिटिशांनी भारत संघटित केला, त्यांच्या अभावी हर्षानंतरचे अराजक पुन्हा माजले असते, असे विधान केले आहे. हे विधान किती भ्रामक व दुराग्रही आहे हे डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी दाखवून दिले आहे आणि तसे करताना बदामीच्या चालुक्यांचा मोठा गौरव केला आहे. त्यांच्या मते उत्तर हिंदुस्थान, दक्षिणापथ ( नर्मदा ते तुंगभद्रा ) व दक्षिण ( तुंगभद्रा ते कन्याकुमारी ) असे भारताचे तीन स्पष्ट विभाग त्या काळी पडले होते. आणि हर्षवर्धन, चालुक्य व पल्लव यांनी या तीन विभागांत साम्राज्ये स्थापून लोक संघटित ठेविले होते व देशाला अराजकापासून वाचविले होते. उत्तरेकडील साम्राज्यांच्या तुलनेने दक्षिणेतील ही साम्राज्ये लहान असली तरी सर्व दक्षिणापथ एकसत्ताक करून दोनशे वर्षे एवढा प्रदेश संघटित ठेवणे ही कामगिरी लहान नाही. या अवधीत चालुक्य राज्ये कधी मांडलिक झाले नाहीत. उलट गुजराथ, माळवा, आंध्र, कोसल या प्रदेशांवर त्यांनी साम्राज्य प्रस्थापित केले आणि ते दिलीप, ययाती या प्राचीन पौराणिक आदर्शप्रमाणे चालवले हे त्यांस व महाराष्ट्रास भूषणावह आहे.

राष्ट्रकूट
 चालुक्यांच्या मागून सत्तारूढ झालेले राष्ट्रकूट घराणे त्याचे राज्य इ. स. ७५० ते ९७३ असे सुमारे सवादोनशे वर्षे चालले. यापूर्वी निरनिराळी राष्ट्रकूट घराणी