पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०३
राजकीय कर्तृत्व
 

महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक व चालुक्य यांची सामंत म्हणून राज्य करीत होती. मधून मधून काहीकाळ ती स्वतंत्रही होत असावीत. पण मराठवाड्यातील वेरूळ- जवळचे राष्ट्रकूट घराणे सम्राटपदाला चढले, तसे यश त्यापूर्वी कोणत्याही राष्ट्रकूट घराण्याला आले नव्हते. म. म. मिराशी यांच्या मते राष्ट्रकूटांचे एक घराणे चौथ्या शतकात मानपूर म्हणजे सातारा जिह्यातील माण या ठिकाणी राज्य करीत होते. दुसरे घराणे विदर्भात नंदिवर्धन, अचलपूर या प्रदेशात सहाव्या शतकात राज्य करीत होते. आणि तिसरे म्हणजे मराठवाड्यातील वर उल्लेखिलेले घराणे होय.
 या राष्ट्रकूट घराण्यांचा परस्परांशी नात्याचा संबंध होता यास काही प्रमाण नाही. आणि तसा संबंध असेलच असे नाही. कारण राष्ट्रकूट ही प्राचीन काळापासून अधिकारपदवी होती. अर्वाचीन काळातील देसाई, देशमुख, सरदेशमुख, तसे त्या काळी राष्ट्रकूट होते. राष्ट्र हा त्या काळी तालुका, जिल्हा यासारखा राज्याचा एक विभाग होता. त्याचा मुख्य तो राष्ट्रकूट. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट तसाच हा राष्ट्रकूट. त्यामुळे ही घराणी परस्परसंबंध असतीलच असे नाही. डॉ. आळतेकर यांच्या मते अशोकाच्या काळी रथिक नामक अनेक घराणी महाराष्ट्रात व दक्षिणेतही होती. रिस्टिक, रास्टिक हे त्याचेच अपभ्रंश होत. रट्ट हे त्याच लोकांचे नाव होय. इ. सनाच्या चवथ्या शतकात संस्कृतचे जेव्हा पुनरुज्जीवन झाले तेव्हा राष्ट्रिक, राष्ट्रकूट अशी त्या मूळ शब्दाचीच रूपांतरे झाली. भावार्थ असा की राष्ट्रकूट महाराष्ट्रात कोठून बाहेरून आलेले लोक नव्हत किंवा आकस्मिकपणे आठव्या शतकाच्या मध्याला त्यांचा उदय झाला असेही नव्हे या सम्राटांच्या वैभवाच्या काळात जे शिलालेख कोरले गेले त्यात मात्र राष्ट्रकूटांचा मूळपुरुष श्रीकृष्ण होय असे सांगितलेले आढळते. कोठे कोठे श्रीकृष्णाचा सेनापती सात्यकी यालाही तो मान दिला जातो. पण याला ऐतिहासिक पुरावा असा काही नसल्यामुळे ते मत स्वीकारता येत नाही.

स्वराज्यस्थापना
 या घराण्याचा मूळ संस्थापक जो दंतिदुर्ग तो गुजराथेतील चालुक्यांची जी सामंत शाखा होती तिच्या राज्यात एक मोठा अधिकारी होता. त्याचा पिता इन्द्र याने अरबांचा पराभव करणारा जो पुलकेशी त्याची कन्या भवनागा हिचे लग्नमंडपातून हरण करून तिच्याशी विवाह केला होता. दंतिदुर्ग हा तिचाच मुलगा होय. चालुक्य- सत्ता कमजोर झालेली पाहताच त्याने ती संधी साधली व आपले स्वतंत्र राज्य स्थापिले. तो अल्प वयातच तिसाव्या वर्षी मृत्यू पावला. त्या वेळी गुजराथ व खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वऱ्हाड हे महाराष्ट्राचे विभाग यांवर त्याचे राज्य होते. पण याच काळात त्याने कोसल, कलिंग, मालव येथील राजांना जिंकले होते व कांचीच्या पल्लवांवर स्वारी करून त्यांनाही नमविले होते. दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग अजून शेवटचा चालुक्य राजा कीर्तिवर्मा २ रा याच्या ताब्यात होता. दंति-