पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०१
राजकीय कर्तृत्व
 

तेव्हाचे चित्र रंगविलेले आहे.
 पल्लवांवर पुलकेशीने मिळविलेला विजय अल्पकालीन ठरला. महेन्द्रवर्म्याचा पुत्र नरसिंहवर्मा याने आपल्या पित्याच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी बदामीवर स्वारी केली. त्या लढाईत पुलकेशीचा पराभव झाला आणि बहुधा तो तीत मारला गेला, असे पल्लवांच्या लेखावरून दिसते. चालुक्य राजाला पराभूत केल्यानंतर नरसिंहवर्म्याने बदामी या राजधानीचाही विध्वंस केला आणि अशा रीतीने पुलकेशीच्या वैभवशाली कारकीर्दीचा दुःखद असा शेवट झाला.

चालुक्य साम्राज्य
 सत्याश्रय पुलकेशी ( २ रा ) याच्या मृत्यूनंतर १०-१५ वर्षे चालुक्यांचे राज्य अस्तित्वात नसल्यासारखेच होते. पल्लवराजांनी बदामीचा किल्ला बळकावला होता. आणि पुलकेशीला अनेक पुत्र होते तरी पल्लवांचे आक्रमण निपटून काढण्यात ६५५ सालापर्यंत कोणालाही यश आले नाही. या सर्व राजपुत्रांचे आपसात कलह चालू असतील व त्यामुळे कोणीच समर्थ होऊ शकला नसेल असा एक तर्क आहे. शेवटी पुलकेशीचा धाकटा पुत्र विक्रमादित्य १ ला हा पल्लवांना पराभूत करून आपले राज्य परत मिळविण्यात यशस्वी झाला. स्वराज्य अधिगत झाल्यावर त्याने पल्लवांवर आक्रमण करून कांचीही जिंकली. विक्रमादित्य इ. स. ६८१ मध्ये मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा विनयादित्य ( ६८१ - ९६ ), त्याच्या नंतर विजयादित्य ( ६९६-७३३) आणि नंतर विक्रमादित्य २ रा ( ७३३ - ४५ ) असे चालुक्य राजे क्रमाने गादीवर आले. हे बहुतेक सर्व पराक्रमी होते. पल्लवांवर स्वारी करून त्यांचा पराभव करणे व नंतर कावेरी उतरून पांड्य, चोल, चेर (केरल) यांना जिंकून सर्व दक्षिण आपल्या साम्राज्यात आणणे ही धडपड प्रत्येकाची होती. त्याचप्रमाणे गंग, अलूप, कदंब, यांच्यावर स्वारी करून त्यांना नमविणे हेही त्यांच्या पराक्रमाचे कायमचे लक्षण होते. या दोन्ही प्रयत्नांत बहुधा हे सर्व चालुक्य राजे यशस्वी झाले. कधी कधी त्यांच्यावर बाजू उलटून त्यांना रणातून पळ काढावा लागे हे खरे. पण ते अपवादात्मक. सामान्यतः यशःश्री त्यांचीच होती.

आरबांचे निर्दाळण
 चालुक्यांची आंध्र प्रांतात वेंगी येथे एक जशी शाखा होती तशीच लाट म्हणजेच दक्षिण गुजराथेतही होती. आंध्रशाखा प्रारंभापासूनच वेगळी व स्वतंत्र झाली होती. तशी लाटशाखा झाली नव्हती. लाट-चालुक्य शेवटपर्यंत महाराष्ट्रात चालुक्यांचे सामंतच होते. विक्रमादित्य २ रा याच्या कारकीर्दीत त्यांनी एक मोठा पराक्रम केला. इ. स. ७११ पासून आरबांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या. सिंध तर त्यांनी जिंकलाच होता. तेथून ते हळूहळू पूर्वेस व दक्षिणेस पाय पसरू पाहात होते. पण अवंतीच्या