पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९७
राजकीय कर्तृत्व
 

 द्वितीय प्रवरसेनानंतर त्याचा मुलगा नरेन्द्रसेन हा इ. स. ४४० च्या सुमारास गादीवर आला. कुंतल राजकन्या अज्झित भट्टारिका ही याची राणी होती. ही बहुधा कुंतलेश राष्ट्रकूट नृपती देवराज याची कन्या असवी. माळवा व अमरकंटक या प्रदेशांवर स्वारी करून गुप्तसाम्राज्यातील हे आपले जुने प्रदेश नरेन्द्रसेनाने पुन्हा जिंकून घेतले. वीस वर्षे राज्य करून नरेन्द्रसेन मृत्यू पावला व त्याचा पुत्र द्वितीय पृथ्वीषेण हा गादीवर आला (इ. स. ४६० ते ४८० ) याने प्रवरापुराहून आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली. सुप्रसिद्ध संस्कृत कवी भवभूती याचे हेच जन्मस्थान होते, असे पंडितांचे मत आहे. नरेन्द्रसेन व पृथ्वीषेण यांच्या राजवटीत वाकाटकांच्या नंदिवर्धन शाळेला हळूहळू ऱ्हासकाळ येऊ लागला. इ. स. ४९० च्या सुमारास या घराण्याची सत्ता संपुष्टात आली. पण या घराण्याची वत्सगुल्म येथे राज्य करीत असलेली दुसरी शाखा अजून सत्तारूढ होती. तिच्या राज्यात हे राज्य विलीन झाले असे संशोधकांचे अनुमान आहे.

हरिषेण
 वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशीम. प्राचीन काळी हे एक पुण्यक्षेत्र होते. प्रथम प्रवरसेनाचा पुत्र सर्वसेन हा या शाखेचा संस्थापक. महाराष्ट्री प्राकृतातील 'हरिविजय' या काव्याचा कर्ता सर्वसेन तो हाच होय. याच्या नंतर विंध्यसेन, द्वितीय प्रवरसेन, हरिषेण असे पराक्रमी राजे या घराण्यात होऊन गेले. पण त्यांच्याविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. शेवटचा हरिषेण (इ. स. ४७४ - ५१० ) हा तर विशेष पराक्रमी असावा असे वाटते. अजंठा येथील लेखावरून, माळव्यापासून कुंतलपर्यंत व सिंधु- सागरापासून गंगासागरापर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते असे दिसते. त्यानंतर या घराण्यातील राजे नाकर्ते झाल्यामुळे त्यांचे राज्य लयास गेले व इ. स. ५५० च्या सुमारास वाकाटकांच्या साम्राज्याची कर्नाटकचे कदंब, महिष्मतीचे कलचूरी व पुष्करीचे ( मध्य प्रदेश ) नल यांनी आपसात विभागणी केली.
 वाकाटक सम्राट हे विद्याकलांचे भोक्ते व आश्रयदाते होते. त्यांच्यापैकी दोघांनी स्वतःच काव्यरचना केल्याचे वर सांगितलेच आहे. संस्कृत साहित्यशास्त्रातील सुप्रसिद्ध वैदर्भी रीती ही त्यांच्याच राज्यसभेत उदयास येऊन विकसित झाली. अजंठ्याची काही लेणी त्यांच्याच कारकीर्दीत खोदली गेली होती. आणि त्यांच्या घराण्याची प्रशस्ती त्यातील काही शिलालेखांत आहे, यावरून या शिल्पकलेचे ते आश्रयदाते होते यात शंका नाही. पण त्यांचे खरे महत्त्वाचे कार्य म्हणजे हिंदुधर्म व संस्कृती यांचे रक्षण हे होय. इ. स. २२५ नंतरच्या पुढच्या १५० वर्षांच्या काळात म्हणजे गुप्त- घराण्याच्या उदयापर्यंत अन्य कोणीच हिंदुनृपती तसा बलाढ्य नव्हता. त्यामुळे हे धर्मरक्षणाचे कार्य भारशिव आणि वाकाटक यांच्याच शिरी आले. आणि डॉ. जयस्वाल यांच्या मते ते कार्य यांनी उत्तम रीतीने पार पाडले. डॉ. जयस्वाल याचे विशेष श्रेय