पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
९८
 

वाकाटकनृपती प्रथम प्रवरसेन याला देतात. भारतात हिंदुसम्राटांचेच राज्य असले पाहिजे आणि ते राज्य हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे चालले पाहिजे हा विचार त्याने दृढनिश्रयाने प्रसृत केला व प्रत्यक्षात आणला असे त्यांचे मत आहे.
 वर निर्देशिलेली कदंब, कलचूरी व नल ही जी तीन घराणी त्यांपैकी कोणामध्येच साम्राज्य उभारण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यामुळे वाकाटकांनंतर थोड्याच काळात महाराष्ट्रात चालुक्यांचे राज्य प्रस्थापित झाले. त्यांचा परक्रमी राजा म्हणजे सत्याश्रय पुलकेशी हा होय. हा इ. स. ५३५ साली सिंहासनावर आला. त्याचा पिता रणराग व पितामह जयसिंह वल्लभ यांची नावे प्रारंभीचे राजे म्हणून चालुक्य वंशावळीत दिलेली आहेत. पण ते पराक्रमी असले तरी स्वतंत्र नव्हते. सत्याश्रय श्री पृथ्वीवल्लभ पुलकेशी हाच पहिला राजा व या घराण्याचा संस्थापक होय.

बदामीचे चालुक्य
 दंतकथेप्रमाणे चालुक्य वंशाचा मूळ पुरुष मनू हा असून हे क्षत्रिय घराणे मूळचे अयोध्येचे होते अयोध्येला या घराण्याच्या एकुणसाठ राजांनी राज्य केले. त्यानंतर दक्षिणापथात सोळा चालुक्यांनी राज्य केले. ब्रह्मदेवाच्या अंजलीतील पाण्याच्या चुळक्यातून या वंशाचा मूळपुरुष निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यावरून चालुक्य हे नाव पडले, असे पुराणे सांगतात. शिलालेखावरून पाहता चालुक्य हे स्वतःला मानव्यगोत्री हारितीपुत्र म्हणवितात, असे दिसते. त्यांच्या ध्वजावर वराहाचे चित्र असून हा ध्वज भगवान विष्णूने आपल्याला दिला, असे चालुक्य सांगतात. हे घराणे बदामी - विजापूर या प्रांतात असून ते मूळचे कानडी असावे एवढेच इतिहासपंडित काहीशा निश्रयाने सांगू शकतात. त्यापलीकडची सर्व माहिती पुराणे, दंतकथा व घराणे वैभवाला चढल्यानंतर रचलेल्या कल्पितकथा यांवरच अवलंबून असल्यामुळे इतिहासात तिला फारसे महत्त्व देता येत नाही.

अश्वमेध
 वर सांगितल्याप्रमाणे सत्याश्रय पुलकेशी ( १ ला ) हा या घराण्याचा संस्थापक होय. याने अश्वमेध यज्ञ केला आणि शिवाय अग्निष्टोम, अग्निचयन, वाजपेय, पौंडरीक हेही यज्ञ केले. वातापी-बदामी हा किल्ला बांधून तेथे त्याने आपली राजधानी नेली. याच्या राज्याच्या विस्ताराची निश्चित अशी माहिती मिळत नाही. पण याने अश्वमेघ यज्ञ केला त्या अर्थी तो विस्तार बराच मोठा असावा असे वाटते. शिलालेखात याची ययाती, दिलीप या प्राचीन राजांशी तुलना केलेली असून या राजाने मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत व इतर इतिहास यांचा अभ्यास केला होता असे त्याचे वर्णन केलेले आहे. एकतीस वर्षे राज्य करून हा इ. स. ५६६ साली मृत्यू पावला.
 त्याच्यामागून त्याचा मुलगा कीर्तिवर्मा (५६७ - ५९८ ) हा राजपदी आला. सेंद्रक