पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
९६
 

त्यातील लक्षणीय गोष्ट एवढीच की वाकाटक हे गुप्तांचे कधी मांडलिक झाले नाहीत. उत्तर व दक्षिण भारतातील बहुतेक सर्व राज्ये समुद्रगुप्ताने जिंकली. पण रुद्रसेनाने आपले स्वातंत्र्य अबाधित राखले होते. पश्चिमेचे शकक्षत्रप त्यावेळी प्रबळ होते. समुद्रगुप्ताला त्यांना जिंकावयाचे होते. त्या कामी वाकाटकांचे साह्य होईल या अपेक्षेने त्याने रुद्रसेनाला दुखविले नसावे असे वाटते. ते कसेही असले तरी समुद्र- गुप्ताने वाकाटकांना जिंकल्याचा यत्किंचितही पुरावा आढळत नाही. रुद्रसेनाचा पुत्र पृथ्वीषेण हा इ. स. ३६० च्या सुमारास गादीवर आला. त्याने सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. इ. स. ३७६ च्या सुमारास मावळा व सौराष्ट्र या प्रदेशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांवर सम्राट चंद्रगुप्ताने युद्ध पुकारले. त्यावेळी त्याला वाकाटकांनी विपुल साह्य केले. या युतीमुळे क्षत्रपांचे सहज निर्मूलन झाले. याच प्रसंगी पृथ्वीषेणाचा पुत्र द्वितीय रुद्रसेन याला चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती गुप्ता ही देऊन दोन घराण्यांच्या मैत्रीला चिरस्थायी रूप दिले. प्रभावती गुप्ता ही मोठी कर्तबगार राणी होती. तिला संसारसौख्य फार लाभले नाही. लग्नानंतर ७-८ वर्षांतच द्वितीय रुद्रसेन मृत्यू पावला. त्या वेळी दिवाकरसेन व दुसरा प्रवरसेन हे तिचे दोन्ही मुलगे लहान होते. त्यामुळे राज्यभार या राणीच्या शिरी आला. पण तरी न डगमगता मोठ्या धैर्याने तिने इ. स. ३९० ते ४१० अशी वीस वर्षे उत्तम कारभार केला. त्या कामी अर्थातच तिला तिच्या पित्याचे सम्राट चंद्रगुप्ताचे मोठेच साह्य झाले.

कृतयुग
 राणी प्रभावती हिचा मोठा मुलगा दिवाकरसेन हाही अल्पायुषी ठरला. त्याच्या मृत्यूनंतर इ. स. ४१० च्या सुमारास तिचा दुसरा मुलगा दामोदरसेन हा प्रवरसेन हे नाव धारण करून गादीवर बसला. या द्वितीय प्रवरसेनाने सुमारे ३० वर्षे राज्य केले. पहिल्या ८-१० वर्षांनंतर त्याने नंदिवर्धन येथून आपली राजधानी हलविली व प्रवरपूर ही नवी नगरी उभारून तेथे ती नेली. हल्लीचे पवनार ते हेच. 'सेतुबंध' या काव्याचा कर्ता हाच प्रवरसेन होय हे मागे सांगितलेच आहे. याच्या काही गाथा गाथासप्तशतीत समाविष्ट झालेल्या आहेत. हा द्वितीय प्रवरसेन शिवोपासक होता. 'भगवान शंकराच्या कृपेने आपल्याला आपल्या राज्यात कृतयुग निर्माण करता आले', असे याने आपल्या वेलोरा येथील ताम्रपटात म्हटले आहे. हा उल्लेख महत्त्वाचा आहे. सध्याची कलियुगाची घातक कल्पना तेव्हा नव्हती असे दिसते. राजा आपल्या कर्तृत्वाने कृत, त्रेता इ. युगे निर्माण करतो असे महाभारतात म्हटले आहे. हा विचार मानवी कर्तृत्वाला पोषक असा आहे. कालाच्या ओघात ही युगे निर्माण होतात, ते मानवाच्या हातात नाही हा विचार दहाव्या शतकाच्या सुमारास रूढ झाला. भारताचा तेथून पुढे विनाशकाल ओढवला. त्याच्या अनेक प्रधान कारणांपैकी 'कलियुग कल्पना ' हे एक कारण आहे. वाकाटक सम्राट द्वितीय प्रवरसेन याला ती मान्य नव्हती असे दिसते.