पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
८८
 

त्यांनी अनेक वेळा जिंकले तसेच अनेक वेळा त्यांची सत्ता झुगारून ते देश स्वतंत्रही झाले होते. तसे नसते तर दर पिढीला त्यांच्यावर स्वारी करण्याचे यांना कारणच पडले नसते. पण त्या प्रदेशातील सत्ता नष्ट झाली तरी या चालुक्यांची सत्ता नष्ट झाली असे कोणीच म्हटले नाही. कोणालाही तसे वाटले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली तेव्हाच या राजवंशाचा शेवट झाला, असे ठरले. तोपर्यंत नाही. याउलट इतर प्रदेशांत यांच्या इतर शाखांनी स्थापिलेल्या सत्ता टिकून राहिल्या तरी यांची सत्ता टिकली असेही कोणी म्हटले नाही. चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याने आपला भाऊ विष्णुवर्धन झाला आंध्र प्रांतात आपला सामंत म्हणून नेमले होते. पण थोड्याच अवधीत त्याने बदामीचे वर्चस्व झुगारून दिले व तो स्वतंत्र झाला. आंध्रातील वेंगीचे हे पूर्व- चालुक्य घराणे इ.स. १०८० पर्यंत सत्ताधीश होते. पण त्यामुळे बदामीच्या चालुक्यांची राजसत्ता टिकली असे ठरले नाही. महाराष्ट्रातली त्यांची सत्ता गेली त्याबरोबर त्यांची राज्यश्री लोपली. कारण ते महाराष्ट्राचे राजे होते. इतरत्र त्यांचे स्वराज्य असते तर, महाराष्ट्रात त्यांचे साम्राज्य गेले तरी, त्यांच्या सत्तेचा लोप झाला नसता. पण महाराष्ट्रात त्यांचे स्वराज्य होते, साम्राज्य कधीच नव्हते. त्यामुळे ते लुप्त होताच त्यांचा अस्त झाला.

महाराणा फ्रेडरिक
 बदामीच्या चालुक्यांची भाषा कानडी असताना त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे पुष्कळांना विचित्र वाटते. पण इतिहासात असे कधी कधी घडत असते हे त्यांनी ध्यानी घ्यावे. प्रशियाचा महाराणा फ्रेडरिक ( १७१२-८६ ) याच्या जर्मनत्वाबद्दल कोणी शंका घेईल असे वाटत नाही. प्रशिया हा प्रदेश संघटित करून त्याने एक बलाढ्य जर्मन देश प्रस्थापित केला आणि अखिल जर्मनीच्या ऐक्याचा व उत्कर्षाचा पाया घातला. पण त्याला जर्मन भाषेचा तिटकारा होता. तो स्वतः फ्रेंच भाषेतून बोले. त्याने आपले ग्रंथ फ्रेंचमध्येच लिहिले, आपल्या दरबारी फ्रेंच ग्रंथकारांना तो आदराने बोलावी, स्वत: फ्रेंच ग्रंथकार व्हावे ही त्याची आकांक्षा होती. फ्रेंच साहित्य, फ्रेंच पोशाख, फ्रेंच रीतिरिवाज यावर त्याची भक्ती होती. जर्मन जीवनरीतीची तो उघडपणे चेष्टा करी. त्याची बहीण विल्हेमा हिची अशीच वृत्ती होती. त्या काळी जर्मन सुशिक्षित लोक आपसातही फ्रेंच बोलत व फ्रेंच संस्कृतीचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत. पण असे असूनही जर्मन लोकांना संघटित करून, त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत करून, त्यांना जगात फ्रेडरिक यानेच प्रथम प्रतिष्ठा मिळवून दिली, याबद्दल जर्मनीत कोणालाही शंका नाही. लेसिंग या जर्मन साहित्यशास्त्रज्ञाने पुढे जर्मन भाषेचा अभिमान लोकांत जागृत केला. पण फ्रेडरिकने जी स्वत्वजागृती केली तिच्यामुळेच लेसिंगला ते शक्य झाले असे इतिहासपंडित सांगतात ( १ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, २. 'फ्रॉम दीज रूट्स् ' - मेरी कोलम, पृ. ३२ ) . हाच न्याय चालुक्यांना