पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
८६
 

 राष्ट्रकूटांचा जो इतिहास आळतेकरांनी दिला आहे त्यावरून हा विचार जास्त स्पष्ट होतो. गुजराथ, माळवा, ओरिसा, कनोज, आंध्र, पल्लव, पांड्य, चेर, चोल यांच्याप्रमाणेच म्हैसूरच्या गंग राजांशी राष्ट्रकुटांच्या सतत लढाया चालू असत. कृष्ण १ ला, ध्रुव, धारावर्ष, गोविंद ३ रा, अमोघवर्ष या सर्वांनी म्हैसूरवर स्वारी करून गंगांना पराभूत केले आहे. केव्हा केव्हा या लढाया बारा, पंधरा, वीस वर्षेही चालत. कधी कधी गंगराजांना राष्ट्रकूटांनी कैदेत ठेवून आपले राज्यपाल म्हैसूरवर नेमले होते असेही दिसते. पण अन्यत्र राज्य स्थापून महाराष्ट्रावर त्यांनी राज्यपाल नेमून साम्राज्य चालविले असे मात्र अपवादालाही कधी झाले नाही. यावरून राष्ट्रकूटांची भाषा जरी कानडी असली तरी, कर्नाटक ही ते स्वभूमी मानीत नसत असे निश्चित दिसते. त्यांची स्वभूमी महाराष्ट्र ही होती. त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते व साम्राज्य कर्नाटकावर होते. त्यांच्या कित्येक ताम्रपटांत चालुक्यांच्या सैन्याला त्यांनी कर्नाटक सैन्य म्हणून उपहासाने हिणविलेले आहे. राष्ट्रकूटांचा मूळपुरुष दन्तिदुर्ग याने खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर- म्हणजे बहुतेक सर्व महाराष्ट्र चालुक्य राजा कीर्तिवर्मा याचा पराभव करून जिंकला. या त्याच्या पराक्रमाचे वर्णन करताना या ताम्रपटांत कांची, केरळ, चोल, पांड्य, या देशांचे राजे व सम्राट श्रीहर्ष यांचाही पराभव करणारे, इतरांना अजिंक्य असे कर्नाटक सैन्य दन्तिदुर्गाने जिंकले असे म्हटले आहे. हा श्लोक देऊन म. म. मिराशी म्हणतात, दन्तिदुर्ग स्वतः कर्नाटकीय असता तर त्याने पराजित केलेल्या सैन्याला 'कार्णाटक' असे विशेषण लावले नसते ( सं. मुक्तावली, ५, पृ. १५९ ).

कार्णाटकं बलम्
 राष्ट्रकूटांनी चालुक्यसेनेला ' कार्णाटकं बलं ' म्हणून का हिणविले हे एक मोठे कोडंच आहे. अनेक राष्ट्रकूट सामंत चालुक्यांच्या राज्यात सामंत म्हणून त्यांच्याच सैन्यात लढत असत. मानपूरचे, विदर्भातले व मराठवाड्यातलेही राष्ट्रकूट चालुक्यांच्या सैन्यात पराक्रम करीत होते. दन्तिदुर्ग हा प्रारंभी असाच चालुक्यसेनेत होता असा पंडितांचा तर्क आहे. या सर्व राष्ट्रकूटांना, चालुक्यराजे दर पिढीला कर्नाटकावर स्वाऱ्या करीत होते, वनवासी, गंग, अलूप, बाण यांना जिंकून त्यांना मांडलिक करीत होते, हेही माहीत असलेच पाहिजे. या पराक्रमात ते स्वतःही सहभागी होत असले पाहिजेत. म्हणजे ज्या सेनेला त्यांनी 'कार्णाटक ' म्हणून संबोधिले त्या सेनेत ते स्वतःच जातीने हजर होते. तरी त्यांनी असे का म्हणावे, हे सांगणे कठीण आहे. राष्ट्रकूटांची स्वतःची भाषा कानडी होती, त्यांचे अनेक कोरीव लेखही कानडीत होते. यामुळे हे कोडे जास्तच दुर्गम होऊन बसते. पण प्राचीन इतिहासात अशी कोडी बऱ्याच वेळा पुढे येतात. चितोडचा राजा अंबाप्रसाद क्षत्रिय असून स्वतःला 'क्षत्र- संहारकारी ' म्हणवितो हे असेच कोडे आहे, हे मागील प्रकरणी सांगितलेच आहे.