पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८५
महाराष्ट्रीय राजघराणी
 

कूटांविषयी एक विचार वर मांडला आहे. या नावाची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात बसत होती. ही सर्व घराणी परस्पर संबद्ध होती असे नाही. कारण राष्ट्रकूट हे मूळचे कुलनाम नाही. ते अधिकारपदावरून पडलेले नाव आहे. कुळकर्णी, देशपांडे, पोतदार, चिटणीस, देशमुख या अर्वाचीन नावांप्रमाणेच हे नाव आहे. राष्ट्र याचा, प्रदेशाचा, देशाचा जिल्ह्यासारखा विभाग, असा मागे अर्थ होता. त्याचा मुख्य तो राष्ट्रकूट. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट. तसेच नाव होते. यामुळे या नावाची अनेक घराणी येथे झाली. त्यातील मानपुर अथवा साताऱ्यातील माण येथील राष्ट्रकूटांचा निर्देश वर आलाच आहे. याच घराण्याचे पुढे आठव्या शतकात महाराष्ट्रात बलाढ्य साम्राज्य झाले असे म. म. मिराशींनी एके ठिकाणी म्हटले आहे (सं. मुक्तावली, सर २ रा. पृ. ९६ ). पण नंतरच्या एका लेखात मानपूरचे राष्ट्रकूट व विदर्भाचे राष्ट्रकूट यांहून मराठवाड्यात तिसरे एक राष्ट्रकूट घराणे होते व आठव्या शतकात उदयास आले ते हे तिसरे घराणे होय असे मत त्यांनी मांडले आहे (सं. मुक्तावली, सर ५ वा, पृ. १५९). पण ही तीनही घराणी मूळची महाराष्ट्रीय होती याविषयी त्यांना शंका नाही. आठव्या शतकात उदयास आलेले साम्राज्यकर्ते राष्ट्रकूट घराणे त्या वेळी मराठवाड्यात वेरूळ, एलिचपूर येथे होते असे डॉ. अ. स. आळतेकरांचेही मत आहे. पण हे मूळचे लातूर प्रांतातील असून कानडी होते असे ते म्हणतात. इ. स. ६२५ च्या सुमारास ते वेरूळ परिसरात आले व शंभर वर्षांनी तेथूनच त्याने पराक्रमास प्रारंभ केला व पुढे लवकरच साम्राज्य स्थापिले. या चार पिढ्यांच्या काळात हे घराणे महाराष्ट्रीय झाले होते असे त्यांनी म्हटल्याचे मागल्या प्रकरणात सांगितलेच आहे. माझ्या मते हीच विचारसरणी सयुक्तिक आहे.

स्वराज्य महाराष्ट्रात
 डॉ. आळतेकर यांनी आपल्या 'राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स' या ग्रंथात एक नकाशा दिला आहे. त्यात राष्ट्रकुटांच्या सत्तेखालच्या विस्तीर्ण प्रदेशाचे त्यांनी दोन विभाग करून दाखविले आहेत. त्यातील मध्यवर्ती मोठ्या विभागाला राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती ( मूळ प्रदेश, नॉर्मल टेरिटरी ) म्हटले असून दुसऱ्या विभागाला त्यांच्या वर्चस्वाखालील प्रदेश ( झोन ऑफ इन्फ्लुएन्स) असे म्हटले आहे. राष्ट्रकूटांच्या राज्याची प्रकृती म्हणून जो विभाग दाखविला आहे त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा समावेश होतो. उत्तरेस नर्मदा-तापी हा दुआब आणि दक्षिणेस कृष्णा- तुंगभद्रा हा दुआब हेही मुलूख प्रकृतीतच येतात. यांच्या पलीकडे उत्तरेस माळवा व बुंदेलखंड हा प्रदेश आणि दक्षिणेस पेन्नार - कावेरी दुआब हे प्रदेश राष्ट्रकूटांच्या साम्राज्यात, वर्चस्वात येतात. या दक्षिण विभागात म्हैसूर, चितळदुर्ग, बंगलोर, कांची, मद्रास, द्वारसमुद्र हा टापू येतो. यावरून आळतेकरांच्या मतेही राष्ट्रकूटांचे स्वराज्य महाराष्ट्रातच होते असे दिसते.