पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
८४
 

यांचे अनुमान आहे. आपल्या प्रवासवर्णनात ह्यूएनत्संग याने महाराष्ट्र देश, महाराष्ट्र- जन व त्यांचा राजा पुलकेशी यांचा अतिशय गौरव केला आहे. या महाराष्ट्रीय जनांची आपल्या राजावर अनन्य भक्ती होती आणि तोही त्यांच्या बळावर भोवतालच्या राजांना तुच्छ लेखीत असे, असे तो म्हणतो. चालुक्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र देश असेच त्याचे मत होते ( डॉ. डी. सी. सरकार, क्लासिकल एज, पृ. २३६-४० ).
 कांचीच्या पल्लवांविषयी मागील प्रकरणी सांगितलेला विचार येथे लक्षणीय आहे. हे पल्लव मूळचे तामीळ नव्हत. त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती. तरी त्यांनी तामीळनाड प्रांत स्वतःची कर्मभूमी मानली; पराक्रम त्या लोकांसमवेत केला, त्यांना स्वजन मानले. त्यामुळे ते तामीळच होत, असे तेथे म्हटले आहे. ते मूळचे कोठले हे निश्चित सांगता येत नाही. पण माझ्या मते त्याला महत्त्व नाही.
 चालुक्य हे महाराष्ट्राला स्वभूमी मानीत व मराठ्यांना स्वजन मानीत याला आणखीही एक प्रमाण मांडता येईल. ते असे की त्यांचे बहुसंख्य दानलेख महाराष्ट्रातच सापडले आहेत त्यामुळे असे दिसते की त्यांच्या दानगंगेचा ओघ महाराष्ट्रातच वहात होता. चिपळूण, वेंगुर्ले, नेरूर ( सावंतवाडी), सामनगड ( कोल्हापूर ), मिरज, सातारा, इगतपुरी, या ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास चालुक्यांचे पुष्कळसे ताम्रपट सापडले आहेत ( भांडारकर, कलेक्टेड वर्क्स, खंड ३ रा, प्रकरण १० वे ). या परिसरातील गावे यांनी दान दिली आहेत आणि ब्राह्मणांना अग्रहार देऊन त्यांच्या वसाहती वसविल्या आहेत. चालुक्य या भूमीशी कसे एकजीव झाले होते ते यावरून दिसून येईल.

पुलकेशीचे वारस
 सरतेशेवटी बंगालचे इतिहासपंडित रमेशचंद्र दत्त यांचे चालुक्यांच्या महाराष्ट्रीयत्वाविषयीचे मत पाहून चालुक्यांविपयीचा हा विचार संपवू. ते म्हणतात, 'शिलादित्याने ( हर्षाने ) इतर अनेक राजांचा पराभव करून त्यांना मांडलिक बनविले. पण पुलकेशीला त्याला केव्हाही जिंकता आले नाही. उलट पुलकेशीनेच त्याचा पराभव करून स्वाभिमानी मराठ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले एक हजार वर्षांनंतर या पुलकेशीच्याच वारसाने उत्तर हिंदुस्थानचा बादशहा जो औरंगजेब त्याला उपमर्दून मराठ्यांचे स्वातंत्र्य व वैभव त्यांना पुन्हा प्राप्त करून दिले. पुढे मोगल व राजपूत या दोघांचाही ऱ्हास झाल्यावर या पुलकेशीच्या देशजनांनीच भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लिशांशी लढा दिला ( ए हिस्टरी ऑफ सिव्हिलिझेशन ऑफ एन्शंट इंडिया, खंड २ रा, पृ. १५६ ).

राष्ट्रकूट
 चालुक्यांसंबंधीची ही विचारसरणी राष्ट्रकूटांना जशीच्या तशी लागू पडेल. राष्ट्र-