पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/११०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८३
महाराष्ट्रीय राजघराणी
 


तीन महाराष्ट्र
 या प्रशस्तीतील २५ व्या श्लोकात, पुलकेशी ९९००० गावे असलेल्या तीन महाराष्ट्रांचा राजा झाला, हे सुप्रसिद्ध वचन होय. वनवासी, गंग, कोकण, लाट, मालव, गुर्जर हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन १८ ते २२ या श्लोकांत आहे. यावरून त्यानंतर त्याने महाराष्ट्र जिंकला असा अर्थ कोणी करतात. पण तसा अर्थ होणार नाही. कारण २३ व्या श्लोकात त्याने हर्षाचा पराभव केल्याचे वर्णन आहे. पुलकेशीचा व हर्षाचा संग्राम झाला तो इ. स. ६२९-३० साली. त्याआधीच त्याने महाराष्ट्र जिंकला होता हे आप्पायिक गोविंदाची उठावणी व विष्णुवर्धनाचे दानलेख यावरून निश्चित होते. तेव्हा वनवासी, गंग ते कांची या दिग्विजयाआधी पुलकेशीने महाराष्ट्रात आपली सत्ता दृढ केली होती म्हणजेच ते त्याचे स्वराज्य होते यात शंका नाही.
 तीन महाराष्ट्रांचा तो राजा झाला, या विधानाची मागे दुसऱ्या प्रकरणात चर्चा केली आहे. गंग, वनवासी, कोकण, लाट, मालव, गुर्जर या सर्वाचा समावेश त्या वेळी महाराष्ट्रात होत असे, असे शं. रा. शेंडे म्हणतात. त्या विधानाला अन्यत्र कोठेच पुष्टी मिळत नसल्यामुळे ते मान्य करणे कठीण आहे, असे तेथे म्हटले आहे. डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते महाराष्ट्र, कोकण व कर्नाटक हे ते तीन महाराष्ट्र होत. (क्लासिकल एज, पृ २३८ ). पण येथे तीन महाराष्ट्र याचा तीन मोठी राज्ये असा अर्थ त्यांनी केला आहे. पण कर्नाटक, कोकण, लाट (गुजराथ), माळवा, गुर्जर (राजस्थान ) एवढे प्रांत जिंकल्यानंतर वरील तीन प्रदेशांचाच निराळा उल्लेख 'मोठी राज्ये ' असा करण्याचे कारण काय ते समजत नाही. गुजराथ, माळवा, राजस्थान ही राज्ये कोकणापेक्षा निश्चित मोठी आहेत, त्या वेळीही होती. तेव्हा तीन महाराष्ट्र याची नेमकी विवक्षा कवीच्या मनात काय होती ते सांगणे कठीण आहे असे वाटते. याचा विदर्भ, मराठवाडा व कुंतल असाही अर्थ कोणी करतात.

चिनी प्रवासी
 सत्याश्रय पुलकेशी २ रा हा महाराष्ट्राचा राजा होता, त्याचे स्वजन महाराष्ट्रीय होते, त्याने दिग्विजय केले ते मराठा सेनेच्या बळावर केले आणि त्यामुळे तो महाराष्ट्रीय होता, हे त्यावरून निश्चित सिद्ध होईल. त्यासाठी आणखी पुरावा हवा आहे. असे वाटत नाही. आणि हवाच असेल तर तो युएनत्संग या चिनी प्रवाशाने तो दिला आहे. हा प्रवासी इ. स. ६४१ च्या सुमारास महाराष्ट्रात आला होता. त्याने सत्याश्रय पुलकेशी याची भेटही घेतली होती. पुलकेशीची राजधानी भडोचपासून १६७ मैल आहे असे तो म्हणतो. चालुक्यांची राजधानी बदामी ही भडोचपासून ४३५ मैल आहे. तेव्हा तिचा उल्लेख असणे शक्य नाही. म्हणून हा उल्लेख वेरूळचा असावा व ती चालुक्यांची दुय्यम राजधानी असावी असे डॉ. डी. सी. सरकार