पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
८२
 

मिळावे, पुलकेशीला बाजूला सारावे असा डाव त्याने रचला. पण आता पुलकेशी तरुण व समर्थ झाला होता. त्याने हा डाव हाणून पाडला व आपले राज्य परत मिळविले. त्याचे वर्णन करताना नागवर्धन म्हणतो की पुलकेशीने प्रथम स्वराज्य ताब्यात घेतले व नंतर चेर, चोल, पांड्य यांना जिंकले. (प्रवरतुरंगमेण उपार्जित- स्वराज्य-विजितचेरचोलपांड्यक्रमागतराज्यत्रयः ।) हे स्वराज्य कोणते ? मंगलीशाच्या राज्यविस्तारावरून याची कल्पना येईल. कारण प्रथम पुलकेशीने ते ताब्यात घेतले होते. मंगलीशाच्या राज्याचे वर्णन करताना मध्य व उत्तर मराठा मुलुख त्याचप्रमाणे कोकण हा सर्व प्रदेश त्याच्या ताब्यात होता असे 'क्लासिकल एज' या ग्रंथात म्हटले आहे ( भारतीय विद्याभवन प्रकाशन, पृ. २३३ ) पुलकेशीचे हे स्वराज्य होते. आणि चेर, चोल, पांड्य आणि वर उल्लेखिलेले गंग, वनवासी इ. प्रांत यावर त्याचे साम्राज्य होते. चालुक्यांचे ताम्रपट कानडीत असले तरी त्यांचे स्वराज्य महाराष्ट्रात होते. ही भूमी त्यांची कर्मभूमी होती. येथले लोक त्यांचे स्वजन होते. गंगवाडी, वनवासी येथले कर्नाटकी लोक त्यांना परकी होते.
 रविकीर्ती कवीने रचलेल्या ऐहोळी शिलालेखातील प्रशस्तीवरून हा विचार आणखी स्पष्ट होईल. मंगलीश व पुलकेशी यांची यादवी सुरू होऊन मंगलीश मारला गेला व चालुक्य सत्ता डळमळली. हे पाहताच त्यांच्या ताब्यातील अनेक सामंतांनी उठावणी केली. अप्पायिक व गोविंद या दोन सामंतांनी पुलकेशीवर प्रथम चाल केली. त्यांचा सामना भीमा नदीच्या उत्तरेस झाला. यातील गोविंद हा राष्ट्रकूट असून तो मानपूरचा राष्ट्रकूट होता ( म. म. मिराशी, संशोधनमुक्तावली, सर ३ ग, पृ. १०२ ). यावरून पुलकेशीने प्रथम कोणता प्रदेश जिंकला, त्याचे स्वराज्य कोणते होते याची कल्पना येईल. पुलकेशीने पुढे जे विक्रम केले त्याचे वर्णन वरील प्रशस्तीत आहे, त्यावरूनही या विचाराला पुष्टी मिळते. पुलकेशीने वनवासी, गंग, अलूप, कोकण, पुरी (दंडा- राजपुरी ), लाट, मालव, गुर्जर, कलिंग, कोसल, पिष्टपूर, कांची, चोल, पांड्य हे प्रदेश जिंकल्याचे वर्णन त्या लेखात आहे. या प्रदेशांचे भौगोलिक स्थान पाहाता महाराष्ट्राभोवतालच्या वर्तुळरेषेत ते येतात असे दिसून येईल. या वर्णनात महाराष्ट्रातले कुन्तल, नासिक्य, अश्मक, मूलक, विदर्भ हे प्रांत जिंकल्याचा उल्लेखसुद्धा नाही. याचा अर्थ ते सर्व आधीच पुलकेशीच्या ताब्यात होते असा होतो. ते त्याने जिंकलेच नव्हते, असे म्हणणे शक्य नाही. कारण भोवतालचे प्रांत जिंकीत जाऊन मधलाच हा प्रदेश तो मोकळा ठेवील हे अशक्य होय. शिवाय त्याचा भाऊ विष्णुवर्धन याचे इ. स. ६१५-१६ सालचे कोल्हापूर, सातारा प्रदेशातील दानलेख उपलब्ध झाले आहेत. त्यावरून तो प्रदेश पुलकेशीच्या ताब्यात होता याबद्दल शंका राहातच नाही. यावरून कुन्तल (कोल्हापूर, सातारा ), नाशिक, अश्मक ( मराठवाडा ), विदर्भ हा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र हेच चालुक्याचे स्वराज्य होते हे निर्विवाद होय.