पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
८०
 

स्वतः कानडीत ग्रंथरचनाही केली, ही कारणे देऊन डॉ. अ. स. आळतेकर यांनी हे घराणे मूळचे कानडी होते असा निष्कर्ष काढला आहे (दि राष्ट्रकूटाज अँड देअर टाइम्स, पृ. १८-२३) चालुक्य व राष्ट्रकूट यांचे ताम्रपट कानडीत होते व त्यांच्यापैकी काहींनी कानडी वाङमयाला उत्तेजन दिले ही वस्तुस्थितीच आहे. ती कोणालाही नाकारता येणार नाही. असे असतानाही ही घराणी महाराष्ट्रीय होती असे म्हणणाऱ्यांवर फारच मोठी जबाबदारी येते यात शंका नाही. ऐतिहासिक प्रमाणांच्या बळावर ती जबाबदारी पेलता येणे शक्य आहे, असे मला वाटते.
 या घराण्यातील राजे आपले स्वराज्य कोणत्या भूमीला मानीत होते, त्यांची कर्मभूमी कोणती होती, त्यांनी पराक्रम कोणत्या लोकांच्यासह केले, कोणत्या समाजाशी ते एकरूप झाले, या निकषावर निर्णय करावयाचा आहे, हे वर सांगितलेच आहे. या दृष्टीने प्रथम चालुक्यांचा विचार करू.

चालुक्य महाराष्ट्रीय
 चालुक्यांचा पहिला स्वतंत्र राजा म्हणजे पुलकेशी ( १ ला ) हा होय. इ. स. ५३५ ते ५६६ असे बत्तीस वर्षे त्याने राज्य केले. पण त्याच्या आधी त्याचा पितामह जयसिंह याने स्वराज्यस्थापनेच्या उद्योगास प्रारंभ केला होता. त्याचा मुलगा रणराग याने तो उद्योग पुरा करीत आणला होता. जयसिंह व रणराग हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील बदामीच्या परिसरातील होत. पण त्यांनी प्रथम राज्य स्थापिले ते सातारा, कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्र विभागात. त्या काळी या विभागात एका राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. हे राष्ट्रकूट म्हणजे चालुक्यानंतर सम्राटपदावर आलेले राष्ट्रकूट नव्हत. राष्ट्रकूटांची अनेक घराणी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात होती. त्यांतलेच साताऱ्यातील मानपूर म्हणजे अलीकडचे जे माणगाव तेथले हे घराणे होय. वाका- टकांच्या पडत्या काळात या मानपूरच्या राष्ट्रकूट घराण्याने बराच राज्यविस्तार केला होता. या राष्ट्रकूटांचा पराभव करून चालुक्यांनी आपले राज्य स्थापिले, असे प्रथम डॉ. रा. गो. भांडारकरांनी 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन' या ग्रंथात सांगितले होते ( पृ. ६७ ). म्हैसूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. एम. एच. कृष्ण यांनी सध्याच्या मराठा प्रदेशात इ. स. ४७० नंतर बरीच वर्षे राष्ट्रकूट घराणे राज्य करीत होते व त्यांच्यापासून ते राज्य चालुक्यांनी घेतले असेच मत मांडले आहे ( के. व्ही. रंगास्वामी अयंगार कमेमोरेशन व्हॉल्यूम, दि अर्ली राष्ट्रकूटाज ऑफ महाराष्ट्र, पृ. ५५ ). हे राष्ट्रकूट घराणे म्हणजे मानपूरचे - माणचे - राष्ट्रकूट घराणेच होय, असे म. म. मिराशी यांनी नवीन सापडलेल्या शिलालेखांच्या आधारे सिद्ध केले आहे ( संशोधन मुक्तावली, सर ३ रा, पृ. ९५ ) आणि मिराशींचे हे मत बहुमान्य झाले आहे (दि क्लासिकल एज, विद्याभवन, पृ. २००). याचा अर्थ असा की चालुक्यांनी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रात केली आणि तेथेच त्यांच्या वैभवाचा पाया घातला गेला.