पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९
महाराष्ट्रीय राजघराणी
 

ग्रंथाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात बरीच चर्चा करून चालुक्य, राष्ट्रकुट, उत्तर चालुक्य, कांचीने पल्लव ही सर्व घराणी अस्सल मराठा घराणी होती असा सिद्धान्त मांडला आहे. चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांचे ताम्रपट, शिलालेख संस्कृताप्रमाणेच कानडीत आहेत. काही पंडितांच्या मते त्यांची मातृभाषा कानडी होती. यामुळे ही घराणी कानडी होत, असे त्यांचे मत आहे. पण वैद्यांच्या मते हा प्रश्न भाषेचा नसून वंशाचा आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव ही घराणी आर्य क्षत्रिय आहेत. चालुक्य राजे स्वतःला प्रारंभापासून हारितीपुत्र व मानव्यगोत्री म्हणवितात. तर राष्ट्रकूट अत्रिगोत्री म्हणवितात. कदंब, पल्लव हेही त्यांच्या मते आर्यच होत. चाळके, कदम, पालवे ही शाण्णव कुळीच्या मराठ्यांत जी नावे आहेत ती चालुक्य, कदंब, पल्लव यांवरूनच आलेली आहेत. या मराठ्यांतील भाले, खंडागळे ही राष्ट्रकूटांची नावे होत. तेव्हा हे सर्व आर्यक्षत्रिय असून शाण्णव कुळीच्या मराठ्यांत त्यांची गणना होते. म्हणून ही सर्व घराणी मराठा होत असे चिंतामणराव म्हणतात ( मध्ययुगीन भारत, खंड १ ला, पुस्तक १ ले, पृ. ११२ - ११६, पुस्तक २ रे, पृ. १७५, खंड २ रा, पृ. २४९ ).
 चिंतामणराव वैद्य यांचा हा युक्तिवाद टिकण्याजोगा आहे असे वाटत नाही. ही सर्व घराणी आर्य क्षत्रिय होत याबद्दल वाद नाही. पण या क्षत्रियत्वावरून व त्यांच्या गोत्रांवरून ती मराठी कशी ठरतात ते कळत नाही. त्यांच्याच मताने ही सर्व घराणी प्राचीन काळी उत्तरेतून आलेली आहेत. यदू, मनू हे त्यांचे मूळपुरुष होत. त्यामुळे त्यांतील काही सोमवंशी तर काही सूर्यवंशी ठरतात. यावरून ती आर्य ठरतील, क्षत्रिय ठरतील. आता ती महाराष्ट्रात राहिली म्हणून जर ती महाराष्ट्रीय मराठा ठरली तर त्यांच्यांतील पल्लव, कदंब ही घराणी आणखी दक्षिणेकडे जाऊन कांची, वनवासी या प्रदेशात राहिली तर ती तामिळी, कर्नाटकी ठरली पाहिजेत. पण वैद्यांच्या मते हे सर्व वंशावर व गोत्रांवर अवलंबून आहे. पण वंशावरून व गोत्रावरून, वर म्हटल्याप्रमाणे ती आर्य व क्षत्रिय ठरतील. तेवढ्यावरून त्यांना मराठा ठरविता येईल असे वाटत नाही. शिवाय भांडारकरांच्या प्रमाणेच एके ठिकाणी राष्ट्रकूट राजवंशाची प्रस्थापना करणारा राजा दन्तिराज (दन्तिदुर्ग) याच्याविषयी त्यांनी ' महाराष्ट्र देशास स्वातंत्र्य देणारा पहिला हाच राजा होय,' असे म्हटले आहे. (खंड २ रा, पृ. २३८). याचा अर्थ चालुक्यांच्या काळी महाराष्ट्र परतंत्र होता, मांडलिक होता असा होतो ! चालुक्य मराठे असताना त्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र परतंत्र होता या म्हणण्यात तर्कसंगती काय ते कळत नाही.
 पूर्व चालुक्यांची राजधानी बदामी ही विजापूर जिल्ह्यात आहे. त्यांचे अनेक ताम्रपट कानडीत आहेत. म्हणून ते मूळचे कानडी असावे असे अनेक पंडितांचे मत आहे. भारतीय विद्या भवनाच्या 'दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल' या प्रसिद्ध इतिहासात डॉ. डी. सी. सरकार यांनी असेच मत दिले आहे (दि क्लासिकल एज, खंड ३ रा, पृ. २२७ ). राष्ट्रकूट यांची मातृभाषा कानडी होती, त्यांचे ताम्रपट कानडीत आहेत, त्यांनी कानडी वाङ्मयाला उत्तेजन दिले, त्यांतील काही राजांनी