पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
७६
 



वाकाटक
 वाकाटकांनी इ. स. २५० ते इ. स. ५५० असे सुमारे तीनशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले, हे मागे सांगितलेच आहे. यांचे मूळ घराणे उत्तरभारतातील असावे असे व्हिन्सेंट स्मिथ, डॉ. जयस्वाल इ. पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात सध्या बागाट नावाचे एक गाव आहे. तेच पूर्वीचे वाकाट असावे व वाकाटक घराणे तेथलेच असावे असा त्यांचा तर्क आहे. महामहोपाध्याय प्राचार्य वा. वि मिराशी यांनी 'वाकाटक नृपति आणि त्यांचा काल' या आपल्या ग्रंथात या मताचे खंडन करून वाकाटक दाक्षिणात्य होते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याने समाधान होत नाही व हा प्रश्न अनिर्णीतच राहतो. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रस्तुतच्या दृष्टीने त्याचे फारसे महत्त्व नाही. वाकाटकांची कर्मभूमी कोणती होती, ते स्वभूमी कोणत्या प्रदेशाला मानीत आणि साम्राज्यातील प्रदेश कोणत्या राज्यांना मानीत, कोणत्या जनतेशी ते एकजीव होत, इ. वर सांगितलेल्या अनेक गोष्टींना महत्त्व आहे. ते खरे निकष होत. त्यांवरून हे निर्विवाद सिद्ध होते की वाकाटक हे महाराष्ट्रीय होत.
 त्यांचा मूळपुरुष विंध्यशक्ती हा सातवाहनांच्या राज्यात एक सेनापती असून त्यांच्या पडत्या काळी त्याने स्वतंत्र राज्य स्थापले असावे असे पंडितांचे अनुमान आहे. पण शिलालेख व ताम्रपट यांच्या आधारे आज हे मात्र निश्रित सिद्ध झाले आहे की वाकाटकांच्या राज्याची स्थापना प्रथम विदर्भात झाली. रामटेकजवळील नंदिवर्धन ही त्यांची राजधानी असून वत्सगुल्म (वाशीम), प्रवरपुर ( पवनार ) या त्यांच्या नंतरच्या राजधान्या होत्या. विंध्यशक्तीचा पुत्र पहिला प्रवरसेन हा पहिला वाकाटक सम्राट होय. त्याने साठ वर्षे राज्य केले आणि बुंदेलखंडापासून हैदराबादपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर त्याच्या साम्राज्याची त्याच्या चार पुत्रांत विभागणी झाली. त्यातील एका शाखेची वाशीम ही राजधानी होती.
 सातवाहन हे प्राकृत भाषेचे अभिमानी होते व आपल्या राज्यात व साम्राज्यात त्यांनी सर्वत्र महाराष्ट्री प्राकृत भाषाच चालू करण्याचा आग्रह धरला होता, हे गेल्या प्रकरणात सांगितलेच आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापासून पुराण- रचना करणाऱ्या वैदिक संस्कृतीच्या अभिमानी पक्षाचा प्रभाव फारच वाढला आणि संस्कृत भाषेला पुन्हा पूर्वीचे स्थान प्राप्त झाले. अखिल भारतात शास्त्री, पंडित, वैदिक, राजे, महाराजे, सेनापती या सर्वांनी तिचाच आश्रय केला आणि सर्व वाङ्मय- रचना संस्कृतातच होऊ लागली. बौद्ध, जैन यांनी जनतेत धर्मप्रचार करण्याच्या हेतूने प्रारंभी पाली, अर्धमागधी यांचा आश्रय केला होता. पण या काळात संस्कृतचे वर्चस्व एवढे झाले की त्यांनीही संस्कृतात ग्रंथरचना करण्यास प्रारंभ केला. अशा स्थितीत राजेमहाराजे यांनी आपले शिलालेख व ताम्रपट संस्कृतात लिहिले असल्यास नवल नाही. गुप्त सम्राटांनी संस्कृतलाच आश्रय दिला आणि त्यांचेच अनुकरण