पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७५
महाराष्ट्रीय राजघराणी
 

पण एकतर ही चिकित्सा बव्हंशी निष्फळ होते. कोणत्याही घराण्याच्या मूलस्थाना- विषयी निश्चित असा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही आणि येथून पुढे होण्याची फारशी आशा नाही. शिवाय ऐश्वर्यप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घराण्याचा संबंध चंद्र, सूर्य या प्राचीन वंशांशी जोडून देण्याची प्रत्येक राजघराण्याची प्रवृत्ती असल्यामुळे शिलालेख किंवा ताम्रपट यांचा पुरावाही या दृष्टीने विश्वसनीय मानता येत नाही. चालुक्य आपल्याला कधी चंद्रवंशीय तर कधी सूर्यवंशीयही म्हणवितात. राष्ट्रकूट यदुवंशी म्हणवून कधी श्रीकृष्ण तर कधी सात्यकी हा आपला मूळपुरुष असे सांगतात. यामुळे अर्थातच मथुरा, अयोध्या ही त्यांची मूळस्थाने ठरतात. या विधानांना इतिहासात स्थान देणे कठीण आहे. या दृष्टीनेही मूळस्थानशोध हा व्यर्थ आहे. पण माझ्या मते या राजघराण्यांचे महाराष्ट्रीयत्व वा इतरत्व यांचा निर्णय करण्यासाठी या चिकित्सेत शिरणेच अयुक्त होय. श्रीशिवछत्रपती यांचे भोसले घराणे मूळ राजस्थानातील होते असे मत आहे. पण त्यामुळे त्यांना कोणी अमहाराष्ट्रीय मानले नाही, मानीत नाहीत. छत्रपती होण्यापूर्वी तीनशे वर्षे हे घराणे महाराष्ट्रात आले. ही भूमी त्यांनी आपली कर्मभूमी मानली. येथल्या जनतेच्या कल्याणाची त्यांनी चिंता वाहिली, येथले राज्य ते स्वराज्य मानले आणि पराक्रम करावयाचे ते सर्व येथल्या लोकांच्या समवेत, त्यांना बरोबर घेऊन, त्यांचे नेतृत्व स्वीकारून केले आणि अशा रीतीने ते महाराष्ट्राशी एकजीव होऊन गेले. त्यामुळे ते महाराष्ट्रीय झाले. कोणताही समाज वा कोणतेही राजघराणे कर्मभूमी कोणती मानते, स्वकीय कोणाला समजते, समरस कोणाशी होते, कोणत्या समाजाच्या साह्याने पराक्रम करते, कोणत्या भूमीला स्वराज्य मानते यावर त्याचे राष्ट्रीयत्व ठरत असते. हाच न्याय मनात धरून इतिहासाचार्य राजवाडे यांनी भोसले घराणे हे महाराष्ट्राचे स्वकीय ठरविले. त्यांचे मूळस्थान, त्यांच्या मते, मथुरावृंदावनाकडे होते. पण त्यावरून त्यांनी भोसल्यांना परकीय ठरविले नाही. पण आश्चर्य असे की चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांना मात्र त्यांनी हा न्याय लागू केला नाही. अयोध्या, चेदी, मथुरा या प्रदेशांतून ते आले म्हणून त्यांना ते परकीय मानतात आणि त्यांच्या राजवटीत महाराष्ट्र दास्यात होता असे म्हणतात. भोसल्यांच्या सत्तेखाली महाराष्ट्र प्रथम स्वतंत्र झाला असे त्यांचे मत आहे (राधामाधव- विलासचंपू - प्रस्तावना पृ. १७३-७४ ) राजवाड्यांच्या या विधानात नेहमीप्रमाणेच कसलीही तर्कसंगती नाही. ही सरणी पत्करली तर आर्य लोक कायमचे अभारतीय व परकीय ठरतील. तेव्हा अत्यंत तर्कदुष्ट अशी ही उपपत्ती आपण त्याज्यच मानिली पाहिजे.
 तेव्हा आता वर सांगितलेल्या विचारसरणीचा आश्रय करून वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव ही घराणी महाराष्ट्रात स्वकीय होती की परकीय याचा विचार करू.