पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तावना

 समाज संवेदना सूचकांक वाढावा म्हणून 'महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा' हा या विषयावर वेळोवेळी लिहिलेल्या निवडक २५ लेखांचा संग्रह आहे. मी महाराष्ट्र राज्यात महिला व बालकल्याण क्षेत्रात सन १९८० ते २००० पर्यंत दोन दशके नुसता सक्रिय नव्हतो तर नेतृत्व करणारा पदाधिकारी, कार्यकर्ता, संपादक होतो. अनाथ, निराधार, वंचित, उपेक्षित मुलेमुली व महिला हा माझा विशेष जिव्हाळ्याचा विषय. या विषयाशी माझी नाळ जोडली गेली ती जन्मताःच. माझा जन्मच झाला मुळी अनाथाश्रमात. त्यामुळे अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्थांमध्ये माझं बालपण गेलं. तिथंच शिक्षणही झालं. मी पदवीधर झालो तेही या संस्थांच्या साहाय्यामुळेच. पुढे शिक्षक झालो. नोकरी करत एम. ए., पीएच. डी. झालो. प्राध्यापक झालो. दरम्यान संस्थेतील मुलीशी विवाहबद्ध झालो. ही सारी रामकहाणी तुम्हास माझ्या ‘खाली जमीन, वर आकाश' या आत्मकथनात सविस्तर वाचावयास मिळेल. महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा विस्तृत आढावाही त्या पुस्तकात आहे.
 हे कार्य करीत असताना मी केलेले लेखन, भाषणे, विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी केंद्र यातून प्रसिद्ध व प्रक्षेपित होत राहीले त्याचे हे संकलन महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारीत अनाथ, निराधार, वंचित, उपेक्षित मुले, मुली व महिलांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसन कार्य करणाच्या महाराष्ट्रातील अनाथाश्रम, महिलाश्रम, बालगृहे, निरीक्षण गृहे, अनुरक्षण गृहे इ.ची दुर्दशा व विकास बदलाच्या दिशांविषयी प्रामुख्याने विचार करताना तुम्हास आढळून येईल. महिला व बालकल्याण संस्थांचे कार्य या राज्याच्या महिला व बाल धोरणाचा अविभाज्य भाग आहे. त्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या बालक हक्कांच्या अंमलबजावणीचा तो खरं तर कृती कार्यक्रम होय. हे कार्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचेही अंग होय. भारतात हे कार्य प्रथम ब्रिटिशांनी आरंभले. नंतर एतद्देशीय समाजसुधारकांनी यात पुढाकार