पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे


 आपल्या आसपास अशी काही मुले असतात पहा. ती नियमित शाळेत जात नाहीत. नेहमी छोट्या-मोठ्या खोड्या करत राहतात. काहीजण तर चोन्यामाच्याही करतात. अशा मुलांना त्यांचे पालक धाक देताना ऐकलंय तुम्ही? त्यांना बजावलं जातं की, तू चांगला वागला नाहीस, तर तुला 'रिमांड होम'मध्ये घालीन. या नेहमीच्या प्रसंगामुळे रिमांड होम म्हणजे उनाड मुलांची शाळा असा गैरसमज सर्वत्र पसरलेला आढळतो. रिमांड होम म्हणजे बाल गुन्हेगारांचे ‘यातना घर.' ‘मुलांचा तुरुंग' अशी काहीशी समजूत समाजात सर्वत्र दिसून येते. या समजामुळे अशा संस्थांमध्ये सामान्यतः कोणी जात नाही. पूर्वी या संस्थांची रचना व कार्यपद्धती तुरुंगसदृश होती खरी, पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आज या संस्था म्हणजे उपेक्षित बालकांची मुक्तांगणे होऊ पाहात आहेत.

 आता या संस्था निरीक्षणगृह, विशेषगृह, बालगृह, अनुरक्षण गृह इ. स्वरूपात कार्य करत आहेत. आज स्थूलमानाने त्यांना ‘बालगृहाच्या रूपात ओळखले जाते. अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, दारिद्र्य रेषेखालील बालके, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, भिक्षेकरी यांची आपद्ग्रस्त अपत्ये शिवाय अल्पवयीन विवाहिता, कुमारी माता, हुंडाबळी, फूस लावून पळवून नेलेल्या, सोडून दिलेल्या मुली, बलात्कारित भगिनी अशा कितीतरी प्रकारे समाजाच्या अन्याय, अज्ञान आणि उपेक्षेचे बळी ठरल्यामुळे निराधार झालेली मुले-मुली, त्यांचा कसलाही अपराध नसताना शापित जीवन जगत असतात. ही मुले आपल्याच घरातील, समाजातील असताना त्यांना संस्थात्मक चौकटीत जीवन कंठावे लागते आहे. या सर्वांचे आपण काही देणे लागतो, त्यांच्या संदर्भात आपले काही कर्तव्य आहे, अशी सामाजिक पालकत्वाच्या जबाबदारीची जाणीव जनमानसात निर्माण होणे आवश्यक

४८...उपेक्षित बालकांची मुक्तांगणे : बालगृहे