पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४० ते १०० वर्षांच्या प्रौढ, वृद्ध स्त्री-पुरुषांसाठी आपल्याकडे सुरू असलेली रेस्क्यू होम्स, वृद्धाश्रमासारख्या संस्थांतही सुधारणेस भरपूर वाव आहे. येथील लाभार्थीना निर्वाह भत्ता, निवृत्ती वेतन, आरोग्य सुविधा, मनोरंजन अशा सुविधा देण्यावर भर द्यायला हवा.

 या सर्व गोष्टी झाल्या भौतिक जबाबदारीच्या. अनाथाश्रमासारख्या संस्थांची भावनिक व सामाजिक अशी ही जबाबदारी असते. या संस्थांतील मुले, मुली व महिलांच्या भावनिक समृद्धीसाठी सर्व खासगी व शासकीय संस्थांतून कमीअधिक प्रमाणात प्रयत्न केले जातात. असे असूनही या संस्थांकडे पाहण्याची शासन व समाजाची दृष्टी अधिक व्यापक व उदार होणे गरजेचे आहे, हे मी गेल्या २० वर्षांच्या या क्षेत्रातील माझ्या अल्पशा अनुभवाच्या आधारे नम्रपणे सांगू इच्छितो. आपल्या समाजमानसात अनाथाश्रमाचे स्थान हे प्रासंगिक दया दाखवण्याचे ठिकाण इतकेच आहे, ही खेदाची बाब आहे. समाजातील रंजल्या गांजल्यांना आपलेसे करण्यातील साधुता, जगाला प्रेम अर्पण करण्यात असलेला खरा धर्म आपण आचरणात आणायला हवा. प्रासंगिक व अल्प मदत द्यायची व न विसरता वर्तमानपत्रात फोटो छापून आणायचे या वृत्तीतून या कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट होतो. अनाथांना करायची मदत ही अप्रसिद्धपणे व फळाची अपेक्षा न धरता निरपेक्ष भावनेने करायला हवी. या संस्थांकडे आज अर्थबळ, मनुष्यबळ कमी आहे. ते वाढवण्यावर भर द्यायला हवा. हे कार्य समाज व लोक प्रबोधनाद्वारे सहज शक्य आहे. या संदर्भात दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे, नियतकालिके इ. प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका बजावू शकतील. असे झाले तर अनाथाश्रम ख-या अर्थाने सामाजिक पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतील. अनाथाश्रमासारख्या संस्था ज्या दिवशी अनाथ, उपेक्षितांना वरदान देणारे कल्पवृक्ष होतील तो सुदिन. तो लवकर यावा त्यासाठी तुम्ही व आम्ही सर्वांनी मिळून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...४७