पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बालकांना शिक्षण देतानाची दिशा व उद्दिष्टे यावरही हक्क मानणाच्या राष्ट्रांमध्ये एकमत निर्माण करण्यात यश आले आहे. त्यानुसार असे निश्चित करण्यात आले आहे की शिक्षण असे द्यावे जेणेकरून मुलांच्या शारीरिक व मानसिक शक्ती, त्यांचे सुप्त गुण, व्यक्तिमत्त्व विकास व्हावा. शांतता, सहिष्णुता, एकता, समता, मानवी हक्क, स्वातंत्र्य याबद्दल आदर वाढेल असे शिक्षण द्यायला हवे. परमत, धर्म, देश, जात, समाज, संस्कृतीबद्दल आदरभाव वाढविण्याचे उद्दिष्ट मान्य करण्यात आले आहे. मुलांमध्ये समन्वय, सामंजस्य, सद्भाव वाढेल अशी शिक्षणपद्धती स्वीकारण्यात आली आहे. या सर्वांबरोबर पर्यावरण जागृतीचे शिक्षण अनिवार्य म्हणून ठरविण्यात आले आहे. ज्या देशात वंशीय, धार्मिक, भाषिक, अल्पसंख्य गट आहेत त्या देशात अशा गटाच्या मुलांना आपला धर्म, भाषा, संस्कृती जपण्याचा हक्क राहणार आहे. या सर्वांचा विचार करता घर, शाळा, समाज सर्वत्र नागरिक पाल्य, शिक्षक म्हणून आपला व्यवहार वरील मूल्यांना अनुसरून हवा.
 बालकांना विश्रांती घेण्याचा, खेळण्याचा, योग्य अशा करमणुकीचा आस्वाद घेण्याचा, मोकळा वेळ असण्याचा, सांस्कृतिक (कला, संगीत, चित्रकला, शिल्पकला, गायन) जीवनात रमण्याचा हक्क आहे. हे लक्षात घेता मुलांवर आपण अभ्यास, शिस्त, वळण इत्यादी पोटी किती नियंत्रणे लादतो, (खरे तर अत्याचार करतो!) हे समजून येईल. यासाठी सर्व त्या संधी, सोयी, साधने उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य ठरते.
 बालमजुरीपासून संरक्षण मिळण्याचा मुलांना हक्क आहे. मुलांना कोवळ्या वयात सर्व प्रकारच्या श्रमापासून मुक्तीचे आश्वासन हे या हक्कांनी मुलांना दिलेले मोठे वरदान होय. यानुसार सरकारने कायदे करणे व आपण आपल्या परिसरात, दैनिक व्यवहारात याचे पालन करायला हवे. ब-याचदा मुला-मुलींचा वापर लैंगिक व्यवहार, अंमली पदार्थांची वाहतूक, शर्यती इत्यादींमध्ये केला जातो. अशा असामाजिक व गैरव्यवहारापासून मुक्तीचा हक्क आहे. कोणत्याही कारणाने मुले पळविणे वा विकणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

 मुलांच्या हक्कांचा विचार करता त्यांचे स्वातंत्र्य, स्वत्व, प्रतिष्ठा, मनोभाव जपण्यासाठी १८ वर्षांच्या आत त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षण, तुरुंगवास,

२२...बालकांचे हक्क व आपली कर्तव्ये