पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. काही ठिकाणी (महिलाश्रम) १० वर्षांपर्यंतची मुले व १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा एकत्र सांभाळ होत असायचा. आता तो माध्यमांच्या विकासामुळे मुलंमुली लवकर प्रौढ होऊ लागली, त्यांना समजू लवकर लागलं म्हणून स्वतंत्र सांभाळली जातात. या वयोगटातील मुला-मुलींचा सामाजिक प्रश्न, स्वरूपावर आधारित वेगवेगळ्या संस्था अस्तित्वात आहेत. उदा. निरीक्षणगृहात बालगुन्हेगार व निराधारांचा सांभाळ होतो. यांचा सांभाळ कालावधी ३ ते ६ महिने असतो. बालगृहात मुलं-मुली सज्ञान होईपर्यंत सांभाळली जातात. तर अनुरक्षण गृहात सज्ञान झालेली मुलं-मुली असतात. निरीक्षणगृहात बंदिस्तपणा असतो. शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, समुपदेशन, निवास, भोजन साच्या सुविधा असतात. बालगृहात हे सारं खुल्या वातावरणात मिळतं. शिवाय इथला कालावधी दीर्घ असतो. अनुरक्षण गृहात रोजगार, सेवायोजन, विवाह, नोकरी इ. पुनर्वसनकेंद्री सुविधा पुरवून त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मध्यप्रवाहात सुस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. या सा-या संस्था काही शासन चालवतं तर काही स्वयंसेवी संस्था. त्यामुळे अशा संस्थांना कुटुंबाचं येणारं औपचारिक, अनौपचारिक रूप तेथील यंत्रणेवर अवलंबून असतं. ‘आश्रम नावाचे घर’, ‘खाली जमीन, वर आकाश, ‘पोरके दिवस', 'बिनपटाची चौकट' सारख्या आत्मकथनातून या संस्थांच्या कुटुंब पद्धती, नाती, संबंध इ.बाबत विस्ताराने लिहिलं गेलं आहे. शिवाय अशा संस्थांचे कार्य करणारे कार्यकर्ते होते त्यांचीही आत्मवृत्ते संस्थात्मक एकात्मिक कुटुंबांबाबत बरंच सांगून जातात. धोंडो केशव कर्वे यांचे 'आत्मवृत्त', कमलाबाई देशपांडेचं ‘स्मरण साखळी', विभावरी शिरूरकरांचं ‘कळ्यांचे नि:श्वास.' पार्वतीबाई आठवलेंचे 'माझी कहाणी', आनंदीबाई कर्वेचे ‘माझे पुराण' अशी मोठी यादी सांगता येईल. रेणुताई गावसकरांचं ‘आमचा काय गुन्हा'च्या प्रस्तावनेत ती मी विस्ताराने दिली आहे. रेणुताईंचं पुस्तकही असंच वाचनीय.
 तुरुंग, वसतिगृहासारख्या संस्थाही एकात्मिक संस्थात्मक कुटुंबाचाच हिस्सा असला तरी तिथे कुटुंबभाव तिथल्या औपचारिक व्यवस्थेत फार अल्प असतो.
 समाजपरिघाबाहेरील कुटुंबातील नातेसंबंध

 समाजातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल असलेला आपलेपणा हा व्यक्तिगत संबंधातून तयार होत असतो व तो जन्मभर राहतो.

१४६...कुटुंब नसलेल्यांची कुटुंब