पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थात्मक कुटुंबातील मानवी संबंध हे त्या व्यक्तीच्या संस्थेतील निवासकालापुरते मर्यादित असल्याने त्यांना एक प्रकारची औपचारिकता तर असतेच, पण शिवाय ती काळाच्या अंगाने क्षणिक, तात्पुरते असतात. अपवादाने इथं संस्थेनंतरच्या काळातही हे संबंध जपले, जोडले जातात. पण ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. शिवाय या कुटुंबाचे सारे व्यवहार सामूहिक असतात.
 संस्थात्मक एकात्मिक कुटुंबात व्यक्तिसंबंधांना आत्मीयतेचा स्पर्श असल्याने लाड, कोड-कौतुक, रुसणं-फुगणं होत मुलं वाढतात. तिथं घडणं असतं तसं बिघडणं पण. परंतु संस्था कुटुंबात परिपाठ, शिस्त, वेळापत्रक, नियम असल्यानं बिघडण्यास वाव नसतो. तिथं मुलं, मुली लवकर स्वावलंबी, प्रौढ, जबाबदार होतात. खरं तर अकालीच प्रौढत्व येतं त्यांना. आदर, आज्ञाधारकपणा, नियमितता इ. गोष्टी संस्थात्मक रचनेतून व्यक्तीस मिळालेलं वरदान ठरतं.
 संस्थात्मक कुटुंब हे खरं धर्मनिरपेक्ष कुटुंब असतं. इथं जात, धर्म, वंश, उच्चनीचता, आपपर भेद यांना वाव नसल्याने थाराच नसतो. ‘सब घोडे बाराटक्के असा प्रघात असल्यानं कुटुंबातलं लाडका, दोडका, जवळचा, लांबचा, सख्खाचुलत असे भेद नसतात. सर्व प्रकारची समानता हे मोठं मानवी मूल्य या कुटुंबात आपसूक आढळतं...
 मुली-महिलांच्या संस्थांच्या संस्थांच्या कुटुंबाचे स्वरूप मातृसत्ताक असतं तर मुलांच्या संस्थांचे कुटुंब पितृसत्ताक असतं. तुलनेनं मुली, महिलांच्या संस्थात्मक कुटुंबात आस्था, प्रेम, भावुकता, आपलेपणा अधिक प्रमाणात आढळतो.
 समाजातील कुटुंब आकार, संख्येनं छोटी होत निघालीत तर संस्थात्मक कुटुंबं आकारानं, संख्येनं वाढत आहेत. हे समाज कुटुंबाची दिवाळखोरी सिद्ध करणारं ठरावं.
 संस्थात्मक एकात्मिक कुटुंबातून आदर्श नागरिक घडवण्याची प्रक्रिया घडत असल्याने समाज आदर्श, प्रगल्भ, जबाबदार होण्यात यांचे योगदान महत्वपूर्ण ठरते.

 समाजातील सर्वाधिक वंचित, उपेक्षित, अपंग, वृद्ध, नाकारलेल्यांना स्वीकारून त्यांना सबळ, स्वावलंबी, संस्कारी बनवण्याचे संस्थात्मक कुटुंबांचे कार्य सकारात्मक मानावे लागेल.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१४७