पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मातेस आपल्या बाळाला घेऊन सन्मानाने जगता येतं, त्यासाठी सर्व सुविधा, सवलती, आधार, अर्थबळ असतं तसं आपणाकडेही असायला हवं. नैतिकतेच्या दुराग्रहामुळे आपण आई-मुलाची ताटातूट करतो, हे आपल्या लक्षात येत नाही.
 अर्भकालयातली जी मुलं पूर्ण अनाथ, निराधार असतात, त्यांना दत्तक दिलं जाऊन आई, बाबा, घर, नाव, संपत्ती, अधिकार देऊन नागरिक बनण्यास मदत केली जाते. जी मुलं दत्तक जाऊ शकत नाहीत, ज्यांचे आई-बाबा असतात वा दूरचे नातेवाईक असतात पण जे अशा काही मुलांचा घरी सांभाळ करू शकत नाहीत अशी मुलं-मुली ५ वर्षांपेक्षा मोठी झाली की वेगळ्या संस्थांमध्ये पाठवली जातात. तिथं त्यांचं शिक्षण, संगोपन होत राहतं. व्यसनाधीन पालक, दुभंगलेली कुटुंबे, बंदिजनांची अपत्ये सान्यांचा सांभाळ होत राहतो.
 महिला आधारगृह/महिलाश्रम
 अठरा वर्षांवरील कुमारी माता, बलात्कारित भगिनी, परित्यक्ता, घटस्फोटिता, वेश्या, देवदासी, घर सोडून पळून, भांडून आलेल्या अशा कितीतरी भगिनींचा सांभाळ करणारं हे माहेर. हो माहेर! कारण यांना समजून घेऊन, समजावून सांगून त्यांना समाजापासून संरक्षित केलं जातं. यांच्यासाठी समाज असुरक्षित बनलेला असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुमारी माता आली तर तिच्या इच्छेनुसार गर्भपात, बाळंतपण होणार असेल तर तोपर्यंतचा सांभाळ, बाळंतपण, नंतर बाळाचं दत्तकीकरण, या मुलींचे नंतर विवाह, माहेरपण, डोहाळे इ. सारं संस्था करत असते. तिथले अधिकारी, कर्मचारी, काळजीवाहक डोळ्यात तेल घालून त्यांची काळजी घेत असतात. हे खरं असलं तरी ते आई, वडील, पती, प्रियकर होऊ शकत नाही. पर्यायी पालकाची भूमिका संस्था अधिकारी, कर्मचारी बजावत असतात. मुली-महिलांत बहीण, मैत्रीण, मावशी, काकी, मामी इ. नाती आकार घेतात. ती संस्थेत असेपर्यंत राहतात. काहींची नंतरही सांभाळली जातात. अशा संस्थात्मक कुटुंबांचं एक बरं असतं, इथं घरासारखी नाती लादली जात नाहीत, ती लाभतात. इथली नाती ऐच्छिक असतात. इथं सक्तीच्या नात्यांचा धाक, काच नसतो.
 बालकाश्रम/बालिकाश्रम

 ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार मुला-मुलींच्या स्वतंत्र संस्था

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१४५