पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो पण पाझर नसतो. पाखर असते पण पारख नसते. यामुळे ‘सब घोडे बारा टक्के. मुलांचे सगळं घडणं सामूहिक. दिवसभराचा परिपाठ म्हणजे 'शिवाजी म्हणतो...'चा न थांबणारा खेळ! तिथं सारं अनिवार्य असतं. विकल्प नसतो. आवड-निवड नसते. मुलं उसाच्या चरकातून बाहेर पडत असतात. या सर्वांचा परिणाम त्यांच्या एकसुरी व्यक्तित्व घडण्यात होत असतो. संस्थेतील मुलं-मुली ‘छापाचे गणपती' असतात. एक मुद्रा धारी! झोपतील तर एकाच बाजूला तोंड करून. ती असतात त्या पाव्हलॉवची ‘प्रतिक्षेपी कुत्री.' त्यांचे सारे क्रिया-कलाप घंटेवर अवलंबून असतात. उठणं, शी, सू, भूक, झोपणं, खेळणं सारं घंटाकेंद्रित नि प्रेरित! त्यामुळे ती जशी कौमार्याकडे झुकू लागतात तसं त्यांचं खिदळणं लोपतं. खिन्न, मौन राहणारी ही मुलं तारुण्याच्या कल्पनेनं गोठत, गारठत जातात खरी!
 कौमार्य म्हणजे जाणिवेचा पहिला हुंकार. घरात हा हळूहळू फुटतो. संस्थेत तो एका रात्रीतच कधी प्रगल्भ होतो. इथं कौमार्याची शिकार किशोरांकडून, किशोरांची शिकार युवकांकडून नित्य होत असते. सर्वांबाबत हे नसलं तरी सररास असतं खरं. समलिंगी संबंधांची पहिल्यांदा कुजबुज ऐकू येते. संस्थेत एकांत, आडोसा कमी. त्यामुळे इथं लैंगिक शिक्षण व्यवहारानेच होत राहतं. या सा-याचा परिणाम मुलां-मुलींच्या अकाली प्रौढ होण्यात होतो. घरात जे प्रयत्नपूर्वक शिकवता येत नाही ते इथं विनासायास शिकवलं जातं. इथली सारी गती लोकलसारखी असते. तुम्ही नुसतं गर्दीत उभारायचं, चढले जाता नि उतरलेही. ती सर्व मुलं हाताबाहेर जातात असं मात्र नाही. मूळ मातीची म्हणून एक वीण असते. ती माणसास सान्या विपरीतातही सुबुद्धी देत राहते. शेवटी माणसाचं घडणं-बिघडणं स्वतःवरच अवलंबून असतं. हे संस्थेतील मुलांबाबतही खरं असतं.
 संस्थात्मक घडणीचे फायदेही असतात. मुलं वक्तशीर होतात, शिस्त असते, नियमित व्यवहाराने नित्यता येते. समूहजीवनाचे धडे संस्था अधिक चांगल्या प्रकारे शिकवते. स्वावलंबन ही संस्थेची मोठी देणगी. आत्मविश्वास द्यावा संस्थेनेच. संस्था तुम्हाला भौतिक समृद्धी नाही देऊ शकत. पण ती संघर्ष समृद्धी देते.

 तिथं चांगलं-वाईट दोन्ही असतं. काय स्वीकारायचं ते तुम्ही ठरवायचं. घरातली मुलं पराधीन असतात. मुलांनी काय बनायचं ते पालक ठरवतात.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१२