पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 संस्थाश्रयी बालकांचं जगणं


 कुणी कितीही प्रयत्न केले तरी संस्था ही घर होऊ शकत नाही. घर ही व्यक्तिगत मांडणी असते. संस्था हा एक सामूहिक पसारा असतो. त्यामुळे घरात वाढणारी मुलं आणि संस्थेतील मुलं यांच्यात आपसूकच फरक असतो. संस्थेतल्या मुलांचं वाढणं, त्यांचा दिनक्रम, संस्थेतील वातावरण आणि छोट्या-मोठ्या गोष्टींतून आपण घरात वाढणाच्या मुलांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव होत राहते. त्यांचं वागणं त्यांना वेगळं करतं. त्यांचं जीवन वेगळं होतं.
 आपलं कोणी नाही, आपण कुणाचे नाही याची खोल बोच या मुलांमध्ये सतत वाढत राहते. संस्थेत अनेक प्रकारची मुलं-मुली असतात. पूर्णपणे अनाथ. ती संस्थेतच जन्मतात, वाढतात, तर काही जन्मल्यानंतर काही दिवसांनी येतात. काही एकाच संस्थेत वाढत प्रौढ होतात तर काही एका संस्थेतून दुस-या संस्थेत फुटबॉलसारखी सतत फेकली जातात. काहींचे आईवडील असतात, पण ते सांभाळ करू शकत नसल्याने त्यांना संस्थेत ठेवतात, टाकतात. कधी एखाद्यास आई-वडील यापैकी एकच पालक असतात. कधी दोन्ही असून त्यांचा एकमेकांत बेबनाव असतो. कधी आई असते पण वडील परागंदा असतात. कधी दूरचे नातेवाईक असतात. प्रासंगिक माया दाखविणारे, पण ही बला गळ्यात पडू नये म्हणून सावधगिरी बाळगणारे. कधी कोणीच नसलेले पण माणुसकीमुळे प्रेम करणारे. प्रत्येकाचं विश्व वेगळं, वाढणं वेगळं, त्यांचं भावविश्व वेगळं, त्यांचे संस्कार वेगळे.

 घरात वाढणाच्या मुलांकडे व्यक्तिगत लक्ष असतं, व्यक्तिगत जिव्हाळा असतो. रुसणं, फुगणं, प्रेम करणं असतं. संस्थेत सारं सुरक्षित अंतरावर चालत असतं. तिथं लक्ष असतं पण सामूहिक. विचारपूस असते गटागटांनी. पहारा

१२२...संस्थाश्रयी बालकांचं जगणं