पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घरातली मुलं 'पोपट' असतात नि ‘पपेट' ही. घरातल्या मुलांवर पालकत्व लादलेलं असतं. त्यांचे पालक कोण हे स्वीकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना नसतं. संस्थेतील मुलांना पालकत्व लाभतं. पालकत्वाची ते निवड करू शकतात. संस्थेचा अपवाद वगळता पालक, मित्र, नोकरी, शिक्षण, पती/पत्नी निवडण्याचं स्वातंत्र्य घरच्या तुलनेनं अधिक. स्वातंत्र्य जितकं अधिक तितकी जोखीम-जबाबदारीही अधिक. संस्थेतील मुलांवर घरा-घरातून होणारे स्वप्न नि विचारांचे बलात्कार नसतात.औपचारिकता, याला काय वाटेल, तो काय म्हणेल असा बाऊ नसतो. मनात चिंतेची कावीळ अटळ असते. भविष्याची टांगती तलवारही असते. संस्थेत कुढणं असतं. स्वगत, स्वसंवादाची रुंजी नित्याचीच म्हणायची. संस्था झोका असतो. तो कधी आकाश दाखवतो तर कधी चक्क पाताळातही नेतो.

 संस्थेतून बाहेर पडलेली अधिकांश मुले-मुली चांगली असतात. चांगली होतात. त्यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान असतं संधीचं. फार कमी मुला-मुलींना पुढील शिक्षणाची संधी मिळते. अधिकांश मुले मॅट्रिकमध्येच मोक्ष मिळवतात. बरीच आय. टी. आय., नर्सिंग, डी. एड्.कडे वळतात. त्यांना स्वावलंबनाचा घोर असतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्वी संस्थाश्रयींसाठी दिवास्वप्न असायचं. हाताच्या बोटांवर मोजावे इतके कॉलेजात गेले. तेही नोकरी करीत. विद्यापीठ शिक्षण म्हणजे सन्माननीय अपवाद. मजूर, नोकरदार मुले अधिक. मुलींचे शिकणं अपवाद. मॅट्रिक म्हणजे लगीनघाई. मुलींच्या नशिबी चांगली स्थळ मिळणं दुरापास्त. सतत नाकारलेपणाच्या शिकार, ‘टाकलेली’, ‘सोडलेली’, ‘बिन आईबापाची पोर' अशा लाखोली सररास. संस्थेतली गुदमर टाळायची म्हणून दाखवेल त्याच्याशी लग्न करायचं अन् जन्माची घुसमट विकत घ्यायची! मुलांचं तुलनेने बरं असतं. कसलाही असला तरी जावईच तो! बरीच मुलं-मुली आपसात लग्न करतात. पण त्यांच्या मुलांना मामा, काका, आजी, आजोबा, मावशी नसल्याचं जन्मभराचं शल्य असतं. मग संस्थाश्रयी मुलं-मुली, सहाध्यायीच त्यांचे नातलग होतात. शेण पडलं तरी माती घेऊन उठतं म्हणतात. विपरीतातही ते स्नेह व सहयोगातून आपलं गणगोत बनवतात. त्यांच्या या मानलेल्या नात्यांत प्रेम, ओढच असते. अढी अजिबात नाही. घर, रक्तसंबंध, भाऊबंदकी यातून येणारा नात्यांचा खोटा आव इथे नसतो.

१२४...संस्थाश्रयी बालकांचं जगणं