पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होळकर बाजीरावांचा पाठलाग करीत सुवर्णदुर्ग येथे आला.परंतु तो येण्याचे पूर्वीच बाजीराव वसईस जाऊन पोहोचला होता. नंतर त्याने सुवर्णदुर्ग घेतला तेव्हां बाजीरावाचा कुटुंबवर्ग त्याच्या हाती सांपडला. इ० स० १८०३ त इंग्लिशांनी पेशव्याच्या वतीने तो किल्ला एक मराठा सरदार बळकावून बसला होता त्याचेपासून घेतला. त्या वेळी आंत ८०० अरब व मुसलमान लोकांची शिबंदी होती. परंतु सामन्यास उभे न राहतां त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेविली व ते इंग्लिशांस शरण आले. इ० स० १८१८ त इंग्लिशांनी पेशव्यांचे राज्य खालसा केले त्या वेळी कर्नल केनेडी याने नोवेंबर महिन्यांत सुवर्णदुर्ग सर केला. त्या वेळी त्याला तेथे थोडासा अडथळा झाला. त्याचा प्रकार येणेप्रमाणे:--कपतान क्याबेल व लेफ़टेनेंट डामीनिसेटी हे दोन सरदार बरोबर ५० शिपाई व ३० खलाशी घेऊन किल्ला घेण्याकरिता निघाले. किल्ल्यांतील शिबंदीने त्यांच्यावर तोफांचा एकसारखा भडिमार चालविला होता. परंतु त्याला न जुमानतां इंग्लिशांचे लोक शिड्या लावून वर चढले. इंग्लिश फौजेचे हे धाडस पाहून किल्लयांतील शिबंदी भिऊन गेली, व त्यांनी किल्ला इंग्लिशांचे खाधीन केला. कनकदुर्गव फत्तेगड हे किल्ले सुवर्णदुर्गाचे समोरासमोर किनाऱ्यावर बांधलेले आहेत. हे दोन किल्ले व सुवर्णदुर्ग यांचेमध्ये एक लहानसा खाडीचा फांटा आहे. जमिनीच्या बाजूने सुवर्णदुर्गास शत्रूचा उपसर्ग लागू नये म्हणूनच हे किल्ले बांधले असावे असे अनुमान होते. परंतु एके ठिकाणी असा वृत्तांत आढळतो की, इ. स. १७१०