पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन्ही बाजूस दोन देवड्या आहेत. शिवाय आंत काही बुरुजांच्या खाली कोठड्या आहेत. दरवाज्यापासून थोड्याशा अंतरावर एक चुनेगच्ची केलेली इमारत आहे. येथे पूर्वी दारूगोळा ठेवीत असत असे सांगतात. हल्ली आंत मोठमोट्या इमारतींचे पाये दृष्टीस पडतात. हे पाये पूर्वीच्या जुन्या राजवाड्यांचे होत. इ. स. १८६२ साली या किल्लयाची पहाणी केली त्या वेळी त्याचा तट व बुरूज हे नीट दुरुस्त होते. परंतु दरवाज्यापाशी पडापड झालेली होती. आंत शिबंदी वगैरे काही नव्हते व जुन्या निरुपयोगी अशा ५।६ तोफा पडलेल्या होत्या. हा किल्ला सोळाव्या शतकांत बहुधा विजापुरकरांनी बांधला असावा. पुढे इ० स० १६६० च्या सुमारास तो शिवाजीच्या हाती आला, व त्याने त्याची नीट दुरुस्ती केली. नंतर शिवाजी आपले आरमार या ठिकाणी ठेवू . लागला. इ० स० १६९८ च्या सुमारास शिवाजीच्या आरमाराचा सरदार कान्होजी आंग्रे हा येथे राहूं लागला. पुढे इ०स० १७१३त सातारचे शाहूमहाराज यांचे पक्षास कान्होजी आंग्रे येऊन मिळाला त्या वेळी शाहूमहाराजांनी तो किल्ला कान्होजीस दिला. कान्होजीच्यामागे तुळाजीच्या कारकीर्दीत सुवर्णदुर्ग हे चांचेपणाचे एक मुख्य ठिकाण झाले. तुळाजीजवळ बळकट आरमार असल्यामुळे एतद्देशीय किंवा परकीय व्यापारी गलबतांस तो फारच त्रास देऊ लागला. पुढे तो इतका बेफाम झाला की, तो पेशव्यांसही जुमानीनासा झाला. पुढे इ. स. १७५५ च्या सुमारास पेशवे व इंग्लिश यांच्यामध्ये तह होऊन त्यांत आंग्र्याचे पारिपत्य करण्याचा निश्चय ठरला. तारीख २२