पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खाडीपासून ८०० फूट अंतरावर व सुमारे ७५ फूट उंचीच्या उंचवट्यावर एक पडापड झालेला मेढेकोट आहे. त्याचप्रमाणे नदीच्या मुखाशी सपाट जागेवर दुसरा एक मेढेकोट आहे व त्याच्या दोन्ही बाजूंस छाती इतक्या उंचीच्या मोडकळीस आलेल्या भिंती आहेत. हे दोन्ही मेढेकोट किल्ल्यांतील तोफांच्या माऱ्याच्या संरक्षणाखाली बांधलेले आहेत. किल्ल्याची दर्शनी बाजू इ० स० १८१८ त अतिवृष्टि होऊन पडून गेली. त्या वेळी किल्लयांत एक लहानशी झोपडी व एक विहीर एवढेच कायतें शिल्लक राहिले. किल्लयाच्या आतील भागाची सर्वत्र पडापड झालेली होती. बेलापूरचे बंदर किल्ल्यापासून सुमारे ५२ फूट लांबीवर असून त्याच्या संरक्षणाकरितां त्या बाजूनें तट घातलेला होता. त्या तटाला दोन बुरूज असून त्यांपैकी एक ७० फूट उंचीचा होता, व त्याच्या एकंदर स्थितीवरून तो एक निराळाच लहानसा स्वतंत्र किल्ला होता असे म्हटले तरी चालेल. त्याच्यावर जो मेढेकोट होता त्यावर खपरेल असून तो नीट दुरुस्त होता. बुरुजाच्या आकाराचीच एक जमिनीत जागा तयार केलेली होती व तिच्यांत कैदी लोक ठेवीत असत. तटबंदीच्या आंत येण्यास खाडीच्या बाजूने एक दरवाजा ठेवलेला होता. पोर्तुगीज लोकांच्या अमलाखाली बेलापूर हा वसई प्रांताखाली मोडणाऱ्या सात पेट्यांपैकी एक पेटा होता, व त्याचे अमलांत एकंदर ६४ खडी होती. तारीख २३ जून इ० स० १८१७ रोजी इंग्लिशांचा सरदार क्यापटन चार्लस ग्रे ह्याने हा किल्ला घेतला.