पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असें म्हटले, व तिला लुगडेंचोळी देऊन परत किल्लयांत . पोहोंचतें केलें. ती परत गेल्यावर तिने आपल्या नवऱ्यास सांगितले की, " चिमणाजी आप्पा मोठा पुण्यवान् आहे. आपणास या लढाईत यश येणार नाही. तेव्हां त्या सरदाराने चिमणाजी आप्पाशी तहाचे बोलणे सुरू केले. पुढे उभयपक्षी तह झाला त्यांत असे ठरले की, पोर्तुगीज लोकांनी आपली चीजवस्त घेऊन आठ दिवसांत किल्ला खाली करून द्यावा. अशा रीतीने तो किल्ला मराठ्याचे हाती आला. वरील हकीगत डफ साहेबांचे इतिहासांत नमूद केलेली नाही. परंतु 'फिरंग्याची बायको हाती लागली असतां चिमणाजी आप्पाने तिचा गौरव करून तिला परत किल्लयांत आपल्या नवऱ्याकडे पाठवून दिले,' ही गोष्ट वसईचे किरिस्तांव लोक अद्यापि मोठ्या आवेशाने व कृतज्ञतापूर्वक सांगतात. वसई मराठयाचे हाती आली तेव्हां क्यापटन डी सौझा हा पोर्तुगीज सरदार तेथें होता. - वसईचा किल्ला व शहर मराठ्यांचे हाती आल्यावर त्याला वाजीपूर असें नांव पडले. मराठ्यांनी तेथे आपला एक सुभेदार नेमला होता, व त्याच्या ताब्यांत बाणकोटच्या खाडीपासून दमणपर्यंत प्रांत दिलेला होता. त्या प्रांतांत पुनः हिंदूंची वस्ती करावी म्हणून पेशव्यांनी पुष्कळ लोकांस फुकट जमिनी दिल्या, व पोर्तुगीज लोकांनी जे हिंदु बाटविले होते, त्यांना शुद्ध करून पुनः जातीत घ्यावे म्हणून तेथे विद्वान् ब्राह्मण लोक नेऊन ठेविले, व त्यांच्या खर्चाबद्दल एक कर बसविला.