पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४७) साहेबांच्या वाडयाजवळच होत असे, व तो महाकालिका देवीस संतुष्ट करण्याकरितां करीत असत. त्या राणीसाहेबांची व इतर भोळ्याभाविकांची अशी समजूत झाली होती की, जोपर्यंत या नरमेधाने महाकालीला संतुष्ट ठेवता येईल, तोपर्यंत या किल्ल्यावर कधीही परचक्र येणार नाही. ह्या महाकालीचे देवालय आंतल्या किल्लयांत दाट झाडीमध्ये होते. तेथें पूर्वी दोन बुरूज होते. त्यांपैकी हल्ली एक अवशिष्ट असून त्यास काली देवीचा बुरूज असे म्हणतात. जिजाबाई साहेब इ० स० १७७२ त कैलासवासी झाल्या. मेजर ग्राहाम हे त्या प्रांतांत असतां त्यांना एक सनद मिळाली होती. ती सनद एका तेल्याने पन्हाळ्याच्या एका बुरुजाखाली जिवंत पुरण्याकरितां आपली सून सरकारच्या स्वाधीन केली ह्मणून त्या तेल्याला काही जमीन इनाम दिली होती त्याबद्दल होती. परंतु ती कोणी दिली ते त्या सनदेवरून कळत नाही असें ते साहेब लिहितात. इ० स० १७८२ त कोल्हापुरच्या राजांनी पन्हाळा येथून आपली गादी हालवून कोल्हापुरास आणिली. शहाजी महाराजांच्या कारकीर्दीत (इ० स० १८२१-३७) इ० स० १८२७ या वर्षी कांही दिवस पन्हाळा व पावनगड हे किल्ले इंग्लिशांनी आपल्या ताब्यात घेतले होते. चौथे शिवाजी महाराज (इ. स. १८३७-६६) हे अज्ञान असतां इ. स. १८४४ त कोल्हापूर प्रांती बंड होऊन बंडवाल्यांनी पन्हाळा व पावनगड हे किल्ले घेतले. त्यांनी सातारच्या राजाच्या दरबारी कर्नल ओव्हन्स नांवाचा साहेब रेसीडेंटीवर होता, तो बाहेर फिरत असतां त्यास कैद केले व त्यास पन्हाळगडावर ठेविलें.